
नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) दोन दिवसांपूर्वीच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections) घोषणा केली होती. यामध्ये राजस्थानात २३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार होते. मात्र, आता या तारखेत बदल करण्यात आला असून २५ नोव्हेंबर रोजी हे मतदान (Voting) पार पडणार आहे. पंरतु, निकाल मात्र निवडणूक आयोगाने अगोदर ठरवलेल्या तारखेला म्हणजेच ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे...
याबाबत निवडणूक आयोगाने एक अधिकृत निवदेन जारी केले असून यामध्ये म्हटले आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि माध्यमांनी उपस्थित केलेल्या एका विषयाला अनुसरुन हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी निश्चित केलेल्या तारखेला म्हणजेच २३ नोव्हेंबरला राजस्थानात (Rajasthan) लग्नाचे मुहूर्त असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोक लग्न समारंभात व्यस्त असणार आहेत. तसेच वाहतुकीची देखील समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय मतदानावर परिणाम होऊन मतदानाचे प्रमाण देखील घटू शकते. त्यामुळे मतदान दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोराम आणि राजस्थान या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमांची घोषणा केली होती. यात मध्यप्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये आणि मिझोराममध्ये ०७ नोव्हेंबर तर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार होते. परंतु, आता राजस्थान विधानसभेसाठीच्या मतदानाची तारखेत बदल करण्यात आला असून याठिकाणी २३ ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर पाचही राज्यांच्या विधानसभेची मतमोजणी ०३ डिसेंबरला होईल.
सुधारित वेळापत्रक (सर्व २०० विधानसभा मतदारसंघ राजस्थान)
राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख - ३० ऑक्टोबर २०२३ (सोमवार)
नामांकन करण्याची शेवटची तारीख - ०६ नोव्हेंबर २०२३ (सोमवार)
नामांकन छाननीची तारीख - ०७ नोव्हेंबर २०२३ (मंगळवार)
माघार घेण्याची शेवटची तारीख - ०९ नोव्हेंबर २०२३ (गुरुवार)
मतदानाची तारीख - २५ नोव्हेंबर २०२३ (शनिवार)
मतमोजणीची तारीख - ०३ डिसेंबर २०२३ (रविवार)
निवडणूक पूर्ण होण्याची तारीख - ०५ डिसेंबर २०२३ (मंगळवार)