महाकवी कालिदास कलामंदिराच्या नियमावलीत बदल

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

हौशी व प्रायोगिक रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी महाकवी कालिदास नाट्यगृह (Kalidas Theatre )परवडणार्‍या दरात उपलब्ध करून देणे. नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे दिल्या जाणार्‍या वि. वा. शिरवाडकर लेखन, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी व बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कारासाठी कलामंदिर मोफत देण्यासह नियमावलीतील शब्दरचनेमुळे अडकून पडलेले डिपॉझिट परत करणे व इतर नियमांमध्ये कलाकारांच्या दृष्टीने सकारात्मक बदल करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar ) यांनी दिले आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेप्रमाणे मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार व अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच होऊन विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी पदाधिकार्‍यांनी आपल्या मागण्या आणि समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर आयुक्तांनी नियमावलीत योग्य ते बदल करण्याच्या सूचना उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांना दिल्या. त्यानुसार नवी नियमावली तयार करण्यात येणार आहे. 2019 मध्ये नवीन स्वरूपात कालिदास सुरू झाल्यानंतर 500 रुपयांपर्यंत तिकीट दर असलेल्या नाटकांसाठी एक दर आणि 500 रुपयांपेक्षा अधिक दर असलेल्या नाटकांसाठी अधिक दर असे निश्चित झाले होते.

मात्र नियमावलीतील शब्दरचनेमुळे 499 आणि तेही फक्त पहिल्या चार रांगांपर्यंत असलेल्या नाटकांसाठी एक दर असा अर्थ निघत आहे. राज्यात असे नियम कुठेही नाही. मध्यंतरी प्रशासनाने कोणालाही विचारात न घेता सत्राची वेळ बदलली. त्यामुळे काही अपरिहार्य कारणांमुळे नाटक सुटण्यास नियोजित वेळेपेक्षा थोडा विलंब झाला तरी प्रयोगाची अनामत रक्कम राखून ठेवली जात आहे. या नियमात बदल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, उमेश गायकवाड, राजेंद्र जाधव, विशाल जातेगावकर, आदिती मोरणकर आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *