Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानामांतरावर आज शिक्कामोर्तब होणार

नामांतरावर आज शिक्कामोर्तब होणार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

आघाडी सरकारने ( Mahavikas Aaghadi Government ) शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा घेतलेला निर्णय ( Change in Name of Aurangabad & Osmanabad ) हा बेकायदेशीर असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी हे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा घेण्यात येतील, असे शुक्रवारी सांगितले. आज, शनिवारी सकाळी होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 29 जूनला राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे पत्र दिले होते. या पत्रानंतर दुपारी उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. ठाणे, रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांची मागणी लक्षात घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मागे घेत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णयही उद्धव ठाकरे यांनी घेतला होता.

मात्र या निर्णयाला मंत्रिमंडळाने स्थगिती दिल्याचे समोर आल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर टीका केली होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती देऊन आपले हिंदुत्व किती बेगडी आहे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. श्रेय घेण्यासाठीच ही स्थगिती दिली असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले. महाविकास आघाडी सरकारने जाताजाता घेतलेला निर्णय चुकीचा होता. राज्य सरकारकडे बहुमत नसताना घेतलेला हा निर्णय होता. अल्पमतातील सरकारने घेतलेला निर्णय असल्याने तो चुकीचा ठरला असता. त्यामुळे हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. राज्य सरकारची देखील औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर करण्याची आणि नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दी. बा. पाटील यांचे नाव देण्याचीच भूमिका आहे. त्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

नामांतर होणारच : फडणवीस

नियम आणि परंपरा अशी आहे की ज्या वेळी राज्यपाल विश्वासदर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात, तेव्हा कुठलाही महत्त्वाचा निर्णय मंत्रीमंडळाने घ्यायचा नसतो. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव किंवा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणे या मागण्यांना मागील सरकारने अडीच वर्षात हात लावला नाही. मात्र बहुमत गमावल्यानंतर बैठक बोलवून निर्णय घेतले. हे संकेतांना धरून नाही, व्याने मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या