Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळेंचे मोठे विधान

नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळेंचे मोठे विधान

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी (Nashik Graduate Constituency) कॉंग्रेसकडून (Congress) डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यासाठी कॉंग्रेसने एबी फॉर्म देखील तांबे यांना दिला होता. त्यामुळे कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार (Candidate) म्हणून डॉ. सुधीर तांबे हेच असणार हे जवळपास निश्चित झाले होते.

- Advertisement -

तर दुसरीकडे भाजपकडून (BJP)डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) हे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचे (Balasaheb Thorat) भाचे असल्याने तांबे पिता-पुत्र भाजपमध्ये गेल्यास थोरात यांच्यासह कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असता. त्यामुळे भाजपनेही शेवटपर्यंत नाशिक पदवीधरसाठी उमेदवार घोषित केलेला नाही. याच दरम्यान डॉ.सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याउलट पुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; सत्यजित तांबेंनी भरला अपक्ष अर्ज

अर्ज भरल्यानंतर सत्यजित तांबे माध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले की, पक्षाकडून वेळेमध्ये एबी फॉर्म आला नसल्याने मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच अपक्ष उमेदवार असलो तरी मी काँग्रेसचाच उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. याशिवाय निवडणूकीत पाठिंबा मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची भेट घेणार असल्याचे सूचक विधान सत्यजित तांबेंनी केले आहे. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, नाशिक पदवीधरसाठी आम्ही भाजपतर्फे राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाचा विचार करत होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. पंरतु, मागच्या सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe Patil) यांनी मांडली आणि निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर आता आम्हाला दिसतंय की, ही अपक्ष निवडणूक होईल. भाजपने अजून कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागितल्यास विचार करु, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नसून निवडणूक बिनविरोध होते की काय अशी शक्यता वर्तविली जात असून राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला नाशिक पदवीधरसाठी उमेदवार न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या