
मुंबई | Mumbai
सध्या राज्यात ऊन-सावलीचा खेळ सुरू असून काही भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस (Rain) हजेरी लावत आहे. तर काही ठिकाणी कडाक्याच्या उन्हाने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अशातच आता हवामान विभागाने (Meteorological Department) पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा दिला आहे....
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. तर पुढील २४ तासांमध्ये मराठवाडा, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmers) आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच यंदा जून (June) महिन्यात पाऊस कमी आणि उष्णता अधिक राहण्याची शक्यता असून ७ ते १० जून या दरम्यान जळगाव जिल्ह्यात तुरळक स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर रविवारी जळगाव जिल्ह्यात दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे तापमान काही प्रमाणात कमी होऊन ४० अंशांवर आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता.
दरम्यान, हवामान विभागाने काल सुद्धा राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळेल अंदाज वर्तवला होता. त्यानंतर पावसाने विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली होती. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली होती.