मध्य रेल्वेचे 'मेरी सहेली' अभियान

रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांना सुरक्षा पुरवणार
मध्य रेल्वेचे 'मेरी सहेली' अभियान

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मध्य रेल्वेने मेरी सहेली कार्यक्रमाची सुरूवात केली आहे. त्यातंर्गत रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांना सुरक्षा पुरवून मदतही केली जाते.

आरपीएफने 24 विशेष गाड्यांमध्ये मेरी सहेली कार्यक्रम सुरू केला असून यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यात मुंबई-नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस, गोदान एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई विशेष, मुंबई-हावडा एक्सप्रेस, पुणे-पाटणा विशेष अशा गाड्यांचा समावेश आहे. महिला प्रवाशांबाबत होणारे गुन्हे, हल्ले, लूट, चोरी, फसवणूक आदी गुन्हे टाळून रेल्वे बोर्डाच्या सूचनांनुसार रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) यासाठी पुढाकार घेतला आहे.

महिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास देण्यासाठी आरपीएफच्या महिला अधिकारी आणि सेवकांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. आरपीएफच्या महिला पोलिस नाशिकरोड, मनमाड, लासलगावसह विविध स्थानकावर गस्तही घालतात. मेरी सहेली ही महिला प्रवाशांची सतत मित्र म्हणून काम करते. सुरुवातीच्या स्थानकांतच नव्हे तर मार्गावरील स्थानकांवर, ट्रेनमध्ये आणि शेवटच्या स्थानकांवर देखील ही सहेली महिला प्रवाशांना मदत करते. सर्व प्रवासी डब्यांना भेट देते. महिला प्रवाशांची ओळख पटवून संवाद साधते.

हे पथक आरपीएफ सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक 182, जीआरपी हेल्पलाईन क्रमांक 1512 आणि इतर सुरक्षा साधनांची माहिती देते. अपरिचित लोकांकडून खाण्यायोग्य वस्तू न स्वीकारणे, अधिकृत आयआरसीटीसी स्टॉल्समधूनच खाद्य खरेदी करण्याबाबत सल्ला देते. नाव, पीएनआर, तिकिट क्रमांक, कोच आणि बर्थ क्रमांक हा प्रवाशांचा तपशील मेरी सहेली नोंदवते. हे तपशील प्रवासाची सुरूवात ते शेवटच्या स्थानकापर्यंत घेतले जातात. थांबलेल्या स्थानकांवर तैनात केलेली मेरी सहेली महिला प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याबद्दल विचारपूस करते. अधिक चांगली सेवा देण्यासाठी पावले उचलण्यासाठी प्रवासाचा अनुभव नोंदवून घेते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com