घरीच सण साजरे करा- केंद्र सरकारची सूचना

घरीच सण साजरे करा- केंद्र सरकारची सूचना
करोना

नवी दिल्ली। वृत्तसंस्था New Delhi

देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा करोना ( Corona )संसर्गामध्ये वाढ झाल्याचे आढळून येत आहे. करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत ( Third wave of corona ) आपल्याला सरकारकडून वारंवार सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या सण-उत्सवांचा हंगाम आहे. अशा काळात निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा गंभीर स्थिती उदभवू नये यासाठी सर्व तज्ञ मंडळी खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत.

दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) इशारा देताना म्हणाले कि, जर आपण आता थोडीशी जरी चूक केली तरी सध्या नियंत्रणात असलेला संसर्ग पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो. यामुळे, सगळे कष्ट व्यर्थ जातील.

डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि मास्क वापरा. करोना संपला असे समजू नका. मास्क वापरणें सोडून देण्याची वेळ अद्याप आलेली नाही.

सध्याच्या संक्रमणाच्या काळात तुम्ही सर्वांनी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सर्व सण साधेपणाने घरातच साजरे केलेत तर खूप योग्य होईल. संसर्गाची गती मंदावली आहे. परंतु आपली जराशा निष्काळजीपणामुळे ती पुन्हा वाढू शकते.

याचसोबत करोना व्हायरसच्या म्यूटेशनबाबत इशारा देताना डॉ पॉल म्हणाले की, जेव्हा जेव्हा विषाणू बदलतो म्हणजे म्यूटेट होतो तेव्हा तो संपूर्ण यंत्रणा हादरवून टाकतो.

लसीकरणासाठी महिलांनी पुढे यावें!

डॉ. व्ही. के. पॉल यांनी यावेळी लसीकरणासाठी महिलांना पुढे येण्याचें आवाहन केलें आहे. ते म्हणाले की, महिलांच्या लसीकरणाचा आकडा आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. गर्भवती महिलांसाठी करोना लस अत्यंत महत्वाची आहे. यावेळी ते असेही म्हणाले कि, ज्यांनी ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसरा डोस देखील वेळेत घ्यावा.

संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी पूर्वतयारी करा : देशमुख

मुंबई । देशातले वैद्यकीय तज्ज्ञ, कृती दलाचे सदस्य यांनी राज्यात करोनाची तिसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तविली असल्याने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने सतर्क राहून आवश्यक असणारी पूर्वतयारी करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी दिले.

देशमुख यांनी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयातील सर्व अधिष्ठांताशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी विभागातील अधिकार्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.

बायोलॉजिकल ई लिमिटेडला मंजुरी

हैदराबादची स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने काही अटींसह दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे. या चाचण्या 5 ते 18 वर्षांच्या मुलांवर केल्या जातील. देशात 10 ठिकाणी चाचण्या केल्या जाणार आहेत. डीसीजीआयने विषय तज्ज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींच्या आधारे ही परवानगी दिली आहे. डीसीजीआयकडून मुलांवर चाचण्यांसाठी परवानगी मिळालेली बायोलॉजिकल ई ही चौथी लस आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com