बकरी ईद संयमाने साजरी करा : जिल्हाधिकारी
मुख्य बातम्या

बकरी ईद संयमाने साजरी करा : जिल्हाधिकारी

करोनाशी यशस्वी प्रतिकाराने मालेगावचा नावलौकिक

Abhay Puntambekar

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोनाशी यशस्वीरीत्या प्रतिकार करण्याचे आगळेवेगळे उदाहरण मालेगाव शहराने सर्वांसमोर ठेवले आहे. बकरी ईददेखील संयमाने साजरी करत शहराचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी येथे बोलताना केले.

येथील पोलीस नियंत्रण आवारातील सुसंवाद हॉल येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरती सिंह, आ. मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अ.पो. अधीक्षक संदीप घुगे, प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, पो. उपअधीक्षक रत्नाकर नवले आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आपण करोना आजारापासून दूर झालो असलो तरी अजून त्याचा धोका टळलेला नाही. सर्वांना नियमांचे पालन करावे लागेल, असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, मालेगाव पॅटर्नबाबत मला नेहमी विचारणा होते त्यावेळेला आम्ही नेहमीच लोकांनी करोनाच्या भीतीवर केलेली ही मात आहे, असे सांगतो. करोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. त्यामुळे बकरी ईदच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी करू नये. गेल्या चार महिन्यांत सर्वधर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईददेखील साधेपणाने साजरी करावी. मनपातर्फे आवश्यक व्यवस्था केली जात आहे.

प्रशासनामार्फत जी काही मदत लागेल ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शहरासह संपूर्ण जगात महामारीचे संकट घोंगावत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून सण साजरा करण्यात येईल, अशी ग्वाही आ. मौलाना मुफ्ती यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शहरातील सामाजिक सलोख्याचे कौतुक केले. कुठल्याही संकटाचा एकजुटीने सामना करणारी जमात या ठिकाणी वास्तव्य करत आहे. आजपर्यंत या नागरिकांकडून मिळालेले सहकार्य यापुढेही मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मनपातर्फे बकरी ईदसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

यावेळी युसूफ इलियास, जमील अन्सारी, शफीक राणा, हिदायत उल्ला, रियाज अन्सारी, बशीर शाह, इम्तियाज इक्बाल, इस्माईल जमाली, केवळ हिरे, हरिप्रसाद गुप्ता, सुनील चांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोठ्या संख्येने शांतता समिती सदस्य उपस्थित होते.

बकरी ईद सण शांततेत पार पडावा यास्तव चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. सध्याच्या काळात निरोगी जीवन जगणे महत्त्वाचे आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार शहरवासियांनी करावा.

डॉ. आरती सिंह ,जिल्हा पोलीसप्रमुख

Deshdoot
www.deshdoot.com