
नाशिक । प्रतिनिधी Nashik
शहराच्या बेशिस्त वाहतुकीला नियंत्रणात आणण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या स्मार्ट सिग्नल कॅमेरातून सिग्नलंचे उल्लंंघन करणार्या बेशिस्त वाहनचालकांवर आता सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे थेट दंड आकारणी केली जाणार आहे.
रिमोट ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे ई-चलनाच्या माध्यमातून वाहनचालकांना ही ऑनलाइन दंड आकारणीची सूचना थेट मोबाईलवरुन मिळणार आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणांवर व मोठ्या प्रमाणात सिग्नलची शिस्त न पाळल्या जाणार्या 45 ठिकाणच्या सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे पोलीस कन्ट्रोल रुममधून आता वॉच ठेवला जाणार आहे.प्रायोगिक तत्वावर सीबीएस व मेहेर सिग्नलवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
पहिल्या दहा दिवसांंत ऑनलाइन दंडआकारणी सिस्टिम सुरू केली जाणार आहे. मेहेर, सीबीएस सिग्नलवर वाहतूक पोलीस आणि स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांना यानी प्राथमिक चाचणी घेतली. सिग्नलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलवर कॅमेरे बसविलेले आहेत.
सिग्नल नियमांचे उल्लंघन केल्यास त्या वाहनाचा नंबर टिपणारा कॅमेरा, सिग्नल जम्पची मर्यादा ओलांडल्यास त्याची नोंद घेणारा कॅमेरा, झेब्रावरील वाहनांवर नजर ठेवणारे कॅमेरे लावण्यात आले आहे. अशा उच्च क्षमतेच्या चार वेगवेगळ्या कॅमेर्यांतून वाहनाच्या हालचालीची नोंद घेत थेट दंड आकारणी केली जाणार आहे. या कॅमेर्यांच्या नजरेतून सुटका होणे खूपच अवघड आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम हे प्रत्येकाला पाळावेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.