Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल; अनेक ठिकाणी CBI ची झाडाझडती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल; अनेक ठिकाणी CBI ची झाडाझडती

मुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची ११ तास चौकशी करण्यात आली होती.

त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘विरोधकांनी आपला हेतू व मेंदू तपासण्याची गरज’

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने सीबीआयला १५ दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबाने केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. मग अनिल देशमुख यांचीही चौकशी झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या