उड्डाणपूल, मेट्रो, महामार्गाचे सूक्ष्म नियोजन करावे

jalgaon-digital
3 Min Read

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

नुकताच भारतमाला योजनेत ( BharatMala Yojana )द्वारका-दत्तमंदिर दरम्यानच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचा ( Flyover ) समावेश झाल्याने निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. हा उड्डाणपुल व या दरम्यानची मेट्रो लाईन हे दोन्ही प्रकल्प एकत्रितपणे उभारण्याचा निर्णय झाला आहे. शिवाय सुरत-चेन्नई महामार्ग ( Surat – Chennai Highway ) हे तीनही प्रकल्प नाशिक शहरसाठी अंत्यत महत्त्वाचे असून भविष्यात उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा डीपीआरमध्ये त्रुटी राहू नये, यासाठी सूक्ष्म नियोजन करुन प्रकल्पाची भक्कमपणे उभारणी करावी, असे आवाहन खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )यांनी केले.

डीपीआर पूर्ण होण्याअगोदर या तीनही प्रकल्पांची माहिती केंद्रीय इंजिनियर असोसिएशनसह विविध संस्थाच्या पदाधिकार्‍यांना मिळावी, यासाठी खा. गोडसे यांच्या पुढाकाराने संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची उंटवाडी येथील अभियंता कार्यालयात प्रकल्पांचे सादरीकरणाचे आयोजन केले होते. यावेळी खा. गोडसे यांनी मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी बी.एस. साळुंके, आकार अभिनव एजन्सीचे विनय शर्मा, दिलीप शुक्ला, मेट्रोचे विकास नागुलकर, संकेत केळकर, केंड्राईचे रवि महाजन, अनंत जातेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चेन्नई-सुरत या महामार्गाचा प्रारंभ पेठ तालुक्यातून होत असून नाशिक, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यांतील 69 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. प्रस्तावित महामार्ग सहा पदरी असणार आहे.

यामुळे सुरत-नाशिक हे अंतर अवघे दोन तासांवर येणार आहे. सुमारे पाच किलोमीटर महामार्ग नाशिक महानगरपालिका हद्दीतून जाणार असून 70 मीटर रुंदीचा असणार आहे. या महामार्गामुळे पेठ, सुरगाणा तालुके पर्यटनसाठी विकसित होणार आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूला 7.5 मीटरचा सर्व्हिस रोड असणार आहे.

शिवाय वळणे खूप कमी असल्याने विविध शहरांमधील अंतर कमी होणार आहे त्यामुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होणार आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी टेनेल तर उमराणे, आडगाव, ओढा, वावी या चार ठिकाणी इंटर चेंजर असणार असून जितक्या किलोमीटरचा रस्ता वापराल तितकाच टोल भरण्याची व्यवस्था असणार आहे.

मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली त्या दरम्यानच द्वारका-दत्तमंदिर रस्त्याचा समावेश भारतमाला योजनेत झाला हा मोठा योगायोग जुळून आला असल्यानेच दोनही प्रकल्पांचे कामे एकत्रित करण्याचा निर्णय झाला आहे.

या तीनही स्तरांमधील अंतर सतरा फुट उंचीचे असणार आहे. मेट्रो आणि सुरत-चेन्नई महामार्गाचा आराखडा अंतिम टप्यात असून लवकरच आराखडा पूर्ण होणार असल्याची माहिती नॅशनल महामार्गाचे व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी दिली.

वरील तीनही प्रकल्पांचे आराखडे पूर्ण झाल्यावर पुन्हा एकत्रित बैठक घेवून काही सूचना असल्यास त्याचा समोवश करण्यात येणार असल्याचे मेट्रो आणि नॅशनल हायवे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बैठकीप्रसंगी खा. गोडसे यांच्यासह उमेश वानखेडे, सचिन बागड, सुशिल बागड, अनिल आहेर, अतुल शिंदे, रसिककुमार बोथरा, मनोज खिवंसरा, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *