Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यारेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्याची मोहीम तीव्र

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्याची मोहीम तीव्र

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटांचा काळाबाजार करण्याच्या आणि विशेष गाड्यांमध्ये आरक्षित आसने अडवून ठेवण्याच्या तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) तिकीट दलालाविरूद्ध मोहिम अधिक तीव्र केली आहे.

- Advertisement -

आरपीएफच्या पथकाने सायबर सेल आणि इतर इंटेलिजेंस इनपुटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारीही सुरु केली आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत हे छापे टाकण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाने वर्ष 2020 मध्ये रेल्वे कायद्याच्या तरतुदींनुसार 466 गुन्हे दाखल केले आहेत.

या छापेमारी दरम्यान 2.78 कोटीची 14,343 तिकिटे जप्त केली. त्यात 14,065 ई-तिकिटे आणि 278 काऊंटर तिकिटांचा समावेश आहे. 492 जणांना अटक करण्यात आली. 466 प्रकरणांपैकी 253 गुन्हे हे मुंबई विभागात दाखल झालेली असून 1.43 कोटी किमतीची 7,002 तिकिटे जप्त करण्यात आली आहे. त्यात 6,863 ई-तिकिटे आणि 139 काऊंटर तिकिटांचा समावेश आहे. एकूण 262 जणांना अटक करण्यात आलीआहे.

प्रवाशांच्या हिताच्या रक्षणासाठी आणि स्क्रिप्टिंग सॉफ्टवेअरच्या वापरासह अनधिकृत तिकीट विक्रीच्या घटना रोखण्याकरीता ही तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. रेल्वे तिकिटे अनधिकृतपणे खरेदी व पुरवठा करण्याचा धंदा करणे हा रेल्वे अधिनियमातील तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे.

अशा अवैध कामात गुंतलेल्या व्यक्तींना रेल्वे कायद्यात अस्तित्त्वात असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार शिक्षा दिली जाते. नाशिकरोड येथे आरपीएफचे पोलिस निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत आणि सहाय्यक निरीक्षक डी.पी. झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या