
मुंबई | प्रतिनिधी
सैन्य बोलवा आणि चिरडून टाका पण दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जुंपली आहे. दोन्ही गटाने मुंबई महापालिकेकडे एक महिन्यापूर्वीच मैदान मिळाण्यासाठी अर्ज केला आहे. आमच्याकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे आमचाच पक्ष खरा असल्याने आम्हाला दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.
यावर संजय राऊत म्हणाले की, ज्या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो तिथे इतिहास होतो. शिवाजी पार्क येथे गेल्या ५०-५५ वर्षापासून आम्ही दसरा मेळावा घेत आहोत. आता हे बेईमान लोक त्यावर दावा सांगत आहेत. शिवसेनेची, मराठी माणसाची ताकद कमी करणे हेच आहे यांचे षडयंत्र आहे. मात्र, तुम्ही कितीही चॅलेंज केले तरी आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. तुमच्या सत्तेने आम्हाला चिरडण्याचे काम केले. दिल्लीतून आर्मी बोलावली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही.
मुंबईत होणाऱ्या मराठी माणसाच्या गळचेपीला एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मराठी माणसांना मुंबईत घरे नाकारली जात आहेत. त्यांची घरे बळकावली जात आहेत. याला एकनाथ शिंदे आणि भाजप याला जबाबदार आहे. मराठी माणसांची गळचेपी करता यावी, मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज दाबला गेला पाहिजे यासाठी शिवसेना फोडली, असा आरोप त्यांनी केला.