Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे

मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे

मुंबई |उध्दव ढगे पाटील| Mumbai

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महाविकास आघाडीला आता मंत्रिमंडळ फेरबदलाचे वेध लागले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राज्यपालांकडून परवानगी मिळत नसल्याने निदान मंत्रिमंडळ फेरबदल मार्गी लावावा, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पुढे आली आहे. त्यासाठी दोन्ही काँग्रेसचे नेते येत्या 7 आणि 8 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यादृष्टीने आघाडीत राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

- Advertisement -

संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात दोन जागा रिक्त आहेत. काँग्रेसकडे असलेले विधानसभेचे अध्यक्षपद एक वर्षापेक्षा अधिक काळ रिक्त आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन जवळपास निम्मा कालावधी लोटत आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरु आहे.

एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे खाते सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. कथित 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख याना गृह मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. सध्या देशमुख हे ईडीच्या अटकेत आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृह खात्याची जबाबदारी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारण्यापूर्वी नाना पटोले यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे आणि या पदाचा कार्यभार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे. झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची सदस्यपदाची मुदत येत्या जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती या दोन पदांमध्ये काही अदलाबदल शक्य आहे काय? याची चाचपणी आघाडीत सुरु असल्याचे कळते.

काँग्रेस आमदारांचे सोनियांना नाराजी पत्र

स्थानिक पातळीवरील पुराची कारणे तसेच पूर नियंत्रणासाठी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून नाना पटोले यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. मंत्रिमंडळातील ग्रेसच्या कोट्यातील सर्व जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींकडून जोपर्यंत आपल्या मंत्र्यांच्या खांदेपालटाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ फेरबदल संभव नाही. शिवाय शासकीय महामंडळावरील नेमणुका रखडल्या आहेत. नाराज आमदाराना महामंडळावर सामावून घेण्याची आघाडीत चर्चा आहे. मात्र, महामंडळ नियुक्त्याना मुहूर्त सापडत नसल्याने आमदारामध्ये नाराजी आहे. काँग्रेसच्या 25 नाराज आमदारांनी निधी वाटप, मतदारसंघातील कामे होत नसल्याबद्दल थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत चर्चा होऊन काय निर्णय होतो, याकडे आघाडीच्या आमदारांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या