
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत पारख (Hemant Parakh) यांचे शनिवारी रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) हद्दीतील त्यांच्या राहत्या घरापासून अपहरण (Kidnaping) करण्यात आले होते. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित ॲक्शन मोडवर येऊन तपास कार्याला प्रारंभ केला होता. त्यानंतर आज सकाळी पारख हे आपल्या घरी सुखरूप पोहोचले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव (Prashant Bachhav) यांनी दिली आहे...
तसेच अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांच्या आदेशानुसार एकूण आठ पथके तयार करण्यात आली असून दोन पथके राज्यबाहेर रवाना करण्यात आल्याची माहिती बच्छाव यांनी दिली. व्यावसायिक हेमंत मदनलाल पारख (वय ५१, रा. श्रध्दा कॉलनी, नभांगण लॉन्सच्या मागे, इंदिरानगर, नाशिक) यांची त्यांच्या राहत्या घरापासून शनिवारी (दि.२) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आज (दि.३) रोजी रविवारी पहाटे पारख घरी आले.
बांधकाम व्यावसायिक पारख यांचे अपहरणकर्त्यांनी त्यांच्या राहत्या घरासमोरून दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर करत अपहरण केले होते. यानंतर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून माहिती घेत तातडीने विविध तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. तसेच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहून त्याआधारे अपहरणकर्त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर ग्रामीण पोलिसांनाही याबाबत माहिती कळवून सतर्क राहत जिल्हा सीमावर्ती भागात नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख सुखरूप घरी परतले असून विविध तपास पथकांकडून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नसून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटना घडताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस उपआयुक्त (गुन्हे) व पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) यांचया मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे व गुन्हेशाखा युनिटचे एकुण ८ पथके अपहरणकर्त्यांच्या शोधार्थ रवाना केले आहेत. त्यापैकी २ पथके परराज्यात पाठविण्यात आली आहेत.
प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) नाशिक