जिल्ह्यातील उद्योगधंदे, बाजार समित्या आज पासून सुरु

राज्याचे निर्बंध कायम
जिल्ह्यातील उद्योगधंदे, बाजार समित्या आज पासून सुरु

नाशिक । प्रतिनिधी

करोनाची त्सुनामी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेली कडक टाळेबंदी आज मध्यरात्री शिथिल केली. त्यामुळे उद्या सोमवारपासून जिल्ह्यातील उद्योगधंदे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या पूर्ववत सुरू होणार आहेत. त्यामुळे ठप्प झालेले अर्थचक्र फिरणार आहे. मात्र राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहणार आहेत. दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी संबंधित आस्थापनांनी घ्यावी, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राज्य शासनाने 13 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात टाळेबंदी जाहीर केली. त्या टाळेबंदीला सरकारने 1 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नाशिकमध्ये वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर 12 ते 23 मेदरम्यान 10 दिवसांची कडक टाळेबंदी लागू केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील बाजार समित्या तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर उद्योग बंद ठेवण्यात आले होते. किराणा दुकानांतून फक्त घरपोच सेवा सुरू होती.

भाजीपाला विक्रीवरही निर्बंध होते. पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांनाच इंधन उपलब्ध करुन दिले जात होते. रात्रीबरोबरच दिवसाही संचारबंदी लागू होती. या कडक निर्बंधांमुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आलेख घसरला असून परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता कडक टाळेबंदी आज मध्यरात्रीपासून शिथिल केली आहे. त्यामुळे उद्योगधंदे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्याही आजपासून सुरू होणार आहेत.

किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या पूर्वीच्या वेळेत सुरू राहणार आहेत. नागरिकांना घराबाहेर पडून किराणा व इतर अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. मात्र टाळेबंदीत शिथिलता आणलेली असली तरी वरील सर्व आस्थापनांनी राज्य शासनाच्या निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, टाळेबंदी शिथिल करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचे व्यापारी, उद्योजक व विविध संघटनांनी स्वागत केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु झाल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनपूर्व शेती कामांनाही गती मिळणार आहे.

गैरसमज टाळा, नियम पाळा!

टाळेबंदी शिथिल झाल्यावर राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत 14 व 21 एप्रिल रोजी राज्यात लागू केलेले निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील. टाळेबंदी पूर्णत: उठली, असा गैरसमज नागरिकांनी करून न घेता नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

किराणा, भाजीपाला चार तास

सर्व किराणा, भाज्यांची दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, मासे आणि अंडी), कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व दुकाने आणि शेती संबंधीची दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 अशी चार तास सुरू ठेवता येतील.

* वरील सर्व दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची मुभा.

* सर्व सलून, ब्यूटी पार्लर पूर्णपणे बंद.

* शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् बंद.

* क्रीडा संकुले आणि स्टेडियम बंद.

* धार्मिक स्थळे बंदच. धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.

* नोंदणीकृत विवाहांना परवानगी.

* अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 माणसांची उपस्थिती.

* सर्व खासगी कार्यालये बंद.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com