Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअग्नितांडव ! अपघातानंतर बस पेटली; 12 प्रवासी होरपळून ठार

अग्नितांडव ! अपघातानंतर बस पेटली; 12 प्रवासी होरपळून ठार

नाशिक / पंचवटी । प्रतिनिधी

पंचवटीतील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरचीसमोरील सिग्नलवर पहाटे पाच वाजता यवतमाळहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस आणि अमृतधामकडून नाशिकरोडकडे जाणारा कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातानंतर बसने पेट घेतला. या आगीत बारा प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले, तर उर्वरित प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस (एमएच 29, ए.डब्लू. 3100) यवतमाळ ते मुंबई जात होती. नाशिकमध्ये मिरची हॉटेलजवळ अमृतधामकडून नाशिकरोडच्या दिशेला जाणार्‍या कंटेनरला (जीजे 05 बी एक्स 0226 ) बसने डिझेल टँकच्या दिशेने जोरदार धडक दिली. या अपघातामुळे कंटेनरचा डिझेल टँक फुटून त्यातील डिझेल बसच्या पुढील बाजूस उडाले. दरम्यान, या अपघाताने बसच्या वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने बसने पेट घेतला.

पहाटेची वेळ असल्याने प्रवासी गाढ झोपेत असल्याने त्यांना काही कळायच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले. काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारून आपले प्राण वाचवले तर एक लहान मुलगी, 10 पुरुष, एक महिला अशा 12 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती घटनास्थळी असलेल्या लोकांनी पोलीस व अग्निशमन दलाला फोनद्वारे दिली.

काही वेळातच या ठिकाणी पोलीस व अग्निशमन दलाने हजर होऊन मदत कार्यास सुरवात केली. यावेळी शववाहिका लवकर न आल्याने सिटीलिंकच्या बसमधूनच मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तर जखमींना रुग्णवाहिका व इतर वाहनांतून तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले गेले. यवतमाळहुन 39 प्रवासी बसमध्ये बसले होते.मुंबईकडे जात असताना सुखाने प्रवास होईल आणि आपल्या घरी आपण सुखाने पोहोचू अशी स्वप्न पाहत असतानाच मिरची हॉटेल जवळ अनेकांच्या स्वप्नांचा जळून चुराडा झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या