Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकारवाईच्या भीतीने आयोजकांची धांदल; बैलगाडा शर्यत थांबवली

कारवाईच्या भीतीने आयोजकांची धांदल; बैलगाडा शर्यत थांबवली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरालगतच्या ओझरमध्ये आज आयोजित करण्यात आलेली बैलगाडा शर्यत (bullock car race) अखेर आयोजकांकडून थांबविण्यात आली. परवानगी न घेताच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे संकेत देताच ही शर्यत करोना नियमांचा फज्जा उडाल्याचे कारण पुढे करत थांबविण्यात आली…

- Advertisement -

विनापरवानगी आयोजित करण्यात आलेली ही शर्यत आयोजकांच्या अंगलट येईल की, काय असे चित्र असतानाच दुसरीकडे या स्पर्धेतील एक बैल अनियंत्रित झाल्यामुळे काहीसा गोंधळ याठिकाणी झाला होता. त्यामुळे पुरती धांदल आयोजकांची झाली. दरम्यान, मध्यरात्रीपासून नवी नियमावली जाहीर केल्यामुळे निर्बंध आले असतानाच स्पर्धेचे आयोजन झालेच कसे असाही प्रश्न उपस्थित राहत आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या शर्यतीची कुठलीही परवानगी नसल्याचे माध्यमांना सांगितल्यानंतर आयोजकांचे धाबे दणाणले.

सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली असून यासाठी पूर्वपरवानगीची गरज असते. यानंतर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमांतून याठिकाणी पाहणी केली जाते. त्यांनतर ही शर्यत घ्यायची की नाही यावर पोलीस आणि प्रशासन परवानगी देत असतात.

मात्र, ओझर येथे होत असलेल्या स्पर्धेची परवनागी न घेतल्याने कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले होते.

यानंतर आयोजकांवर काय कारवाई होईल याकडे लक्ष लागून असतानाच या शर्यतीच्या दरम्यान एका बैल अनियंत्रित झाल्याने किरकोळ अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाल्याची चर्चाही परिसरात रंगली होती.

या घटनेनंतर आयोजकांकडून शर्यत तत्काळ करोनाचे कारण पुढे करत रद्द करण्यात आली. दरम्यान, पोलीस आणि प्रशासनाकडून स्पर्धेच्या आयोजकांवर काय कारवाई केली जाते याकडे सबंध महाराष्टाचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या