आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प
आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई । प्रतिनिधी

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज पासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाचे कामकाज 1 ते 10 मार्च दरम्यान चालणार आहे.

अनेक मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले असून सरकारही विरोधकांना तोंड देण्यास सज्ज झाले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.राज्यपालांचे अभिभाषण, सत्ताधारी तसेच विरोधकांचा प्रस्ताव, पुरवणी मागण्यांसह कामकाज होणार आहे.

राज्याचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प 8 मार्चला दुपारी दोन वाजता सादर होणार आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंत्री आणि आमदारांनाही करोनाबाधा झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अधिवेशनाचा कालावधी मर्यादित ठेवण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

अधिवेशनाचा कार्यक्रम

1 मार्च : राज्यपालांचे अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव, पुरवणी मागण्यांचे सादरीकरण.

2-3 मार्च : राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव.

4 आणि 5 मार्च : पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान, विरोधकांचा प्रस्ताव.

6-7 मार्च : शनिवार, रविवारची सुट्टी

8 मार्च : अर्थसंकल्प सादर होणार

9 मार्च : शासकीय कामकाज, सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव

10 मार्च : अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता.

विरोधकांच्या हाती अनेक मुद्दे

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी सरकारी पक्षातील काही मंत्र्यांनी आयतेच कोलीत विरोधकांच्या हाती दिले आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याशी संबंधित पूजा चव्हाण प्रकरण विधिमंडळात गाजणार आहे. त्यासोबतच इतर अनेक मुद्द्यांवरून सत्ताधार्यांवर तोफ डागण्यासाठी विरोधी पक्ष सरसावला झाला आहे.

विदर्भ आणि कोकणात न मिळालेली नुकसान भरपाई, शेतकरी कर्जमाफी, वाढीव वीजबिल, महिला अत्याचाराचे वाढते प्रमाण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, निधीचे असमान वाटप आदी अनेक मुद्दे अधिवेशनात उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष भाजपकडून केला जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com