
मुंबई | Mumbai
सध्या दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सुरु असलेल्या आयसीसी महिला टी20 वर्ल्डकप (ICC Women's T20 World Cup) मध्ये आज (गुरुवार) सेमीफायनलचा पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत होणार असून यापैकी एक संघ आज सामना जिंकून थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल; परंतु या लढतीपूर्वीच भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे...
भारताची स्टार गोलंदाज पूजा वस्त्राकर आजारपणामुळे सेमीफायनल सामन्यातून बाहेर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा (Pooja Vastrakar) ही आजारी असल्याचे सांगण्यात येत होते, परंतु आता बीसीसीआयने (BCCI) अखेर याची अधिकृत माहिती दिली आहे.
बीसीसीआयच्या सांगण्यानुसार, पूजा हिला अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात भारताच्या प्लेईंग ११ मध्ये खेळू शकणार नाही. तिच्या ऐवजी स्नेह राना (Sneh Rana) हिला संधी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे कर्णधार हरमनप्रीत कौरही (Harmanpreet Kaur) तिच्या तब्बेतीच्या कारणावरून खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. एका वृत्तानुसार, पूजा वस्त्राकर आणि हरमनप्रीत कौर ह्या दोन्हीही आजारी असल्यामुळे स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र त्या मैदानावर उतरतील की नाही हे निश्चित नाही.