
सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
वै. बस्तीरामजी सारडा यांच्या 56 वी पुण्यतिथी निमित्त सारडा विद्यालय व ‘ दै. देशदूत’ने आज (दि. 19) रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते . सारडा विद्यालयात आयोजित रक्तदान शिबीरात 127 रक्तदात्यांनी रक्तदान करीत वै. बस्तीरामजी सारडा यांना अनोख्या पध्दतीने आदरांजली वाहिली. त्यात 19 महिलांचा समावेश आहे.
दै . ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यापूर्वी वै.बस्तीरामजी सारडा यांच्या अर्धपुतळ्याचे पुजन करण्यात आले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष एम. जी. कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित, अनिल करवा, रावसाहेब आढाव, देशदूतचे वितरक राजेंद्र जाजू, प्राचार्य अनिल पवार, आयटीआयचे प्राचार्य सोनवणे, सरदवाडीच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जेजूरकर, चंद्रभान कोटकर व्यासपिठावर उपस्थित होते.
रक्तदान शिबीराचे हे चौथे वर्ष असून माजी विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकही या शिबीरात सहभागी होत असल्याने चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. यानिमित्ताने शाळेबद्दलचे प्रेम, जिव्हाळा वाढण्यासही हातभार लागत असल्याची भावना प्राचार्य पवार यांनी व्यक्त केली. पहिल्या वर्षी 45, दुसर्या वर्षी 55, तिसर्या वर्षी 57 तर चौथ्या वर्षी 127 रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिबीराचा हा आलेख उंचावत नेल्याचे ते म्हणाले. कांतीलाल राठोड यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सुत्रसंचलन राहूल मुळे यांनी केले. पर्यवेक्षक बाळासाहेब हांडे यांनी आभार मानले.
मुल्य जाणून घेत जगायला शिकवले
वै. बस्तीरामजी सारडा यांनी स्वत: मोठं होतांनाच समाजालाही मोठ करण्याचा आदर्श घालून दिला. स्वत:चं मुल्य जाणून घेत जगायला शिकवल्याचे डॉ. बालाजीवाले म्हणाल्या. हीच मुल्य पुढच्या पिढीत रुजवण्याचे काम सारडा विद्यालय करीत असल्याचा गौरव त्यांनी केला. रक्तदान हे इतरांच्या जगण्याला मदत करते. वै. बस्तीरामजी सारडा यांच्या स्मृतिदिनी रक्तदानाचा उपक्रम राबवणे स्तुत्य असल्याचे त्या म्हणाल्या.
माहेश्वरी समाज व साईकृपाचा उत्साह
आजच्या रक्तदान शिबीरात अनेक माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान करीत शाळेबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. काही विद्यार्थ्यांनी सपत्नीक येऊन रक्तदान केले. साईकृपा फाऊंडेशन व माहेश्वरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानातील उत्साह वाखाणण्याजोगा होता. संस्थेच्या आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांनीही खास हजेरी लावत रक्तदान केले. शिबीरातील महिलांचा सहभागही उत्साह वाढवणारा होता. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी निघाल्याने अनेक महिलांना रक्तदान करता आले नाही.
सध्याच्या काळात उद्योजकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. मात्र, एखाद्या उद्योजकाने काय करावे हे वै. बस्तीरामजी सारडा यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे सिन्नर शहरात चांगली शाळा उभी राहिली. चांगली कामे करण्यासाठी परंपरा निर्माण करावी लागते. रक्तदान शिबीराच्या माध्यमातून सारडा विद्यालयाने 4 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरु ठेवणे अभिमानास्पद आहे. देशाला उत्कृष्ट नागरीक देण्याचं काम नाशिक शिक्षण प्रसारक संस्था व सारडा विद्यालय करीत आहे.
एम.जी. कुलकर्णी, उपाध्यक्ष, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ
या संस्थांचाही सहभाग
माजी विद्यार्थी, नाशिक शिक्षण प्रसारकचे आय.टी. आय., सायक्लिस्ट असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर, तालुका पुरोहीत संघ, संस्थेच्या सिन्नर संकूलातील सर्व शाळांचे शिक्षक, पालक शिबीरात सहभागी झाले.