राज्यसभा निवडणूक : गोयल, डॉ.बोंडे यांना भाजपची उमेदवारी

निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
राज्यसभा निवडणूक : गोयल, डॉ.बोंडे यांना भाजपची उमेदवारी

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

येत्या 10 जूनला होऊ घातलेल्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी ( Rajyasabha Elections ) भाजपने महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) आणि माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे (Former Minister Dr. Anil Bonde) यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने महाराष्ट्रातून दोन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी (दि.31) संपत आहे. भाजपने दोनच उमेदवार कायम ठेवले तर राजसभा निवडणूक बिनविरोध होईल.

राज्यसभा निवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने दोन उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा लढवणार आहे. या पक्षाने पुन्हा प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसने अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही तर पाठिंबा न मिळाल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. भाजपने तिसरा उमेदवार दिला तर राज्यसभेची निवडणूक अटळ आहे. मात्र तूर्त आज भाजपने दिल्लीतून दोन उमेदवार दिले. तिसरा उमेदवार अधिकृतपणे घोषित केलेला नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसांत भाजपने उमेदवार दिला नाही तर निवडणूक बिनविरोध पार पडेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत असलेले डॉ. पीयूष गोयल यांची उमेदवारी अपेक्षित होती. मात्र दुसर्‍या जागेसाठी भाजपने विनोद तावडे, पंकजा मुंडे, विनय सहस्त्रबुद्धे, धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील यांची नावे बाजूला सारून डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली गेली. डॉ. बोंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सध्या भाजपच्या किसान आघाडीत सक्रिय असलेल्या डॉ. बोंडे यांना भाजपने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसकडून प्रतापगढी?

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांचे नाव निश्चित झाले आहे. बिहारमधून कन्हैया कुमार, कर्नाटकमधून बी.व्ही. श्रीनिवास यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र महाराष्ट्रातून अनेक जण इच्छुक असताना बाहेरील नेत्याला पक्ष संधी देत असल्याबद्दल महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी नाराजी प्रकट केली आहे. इतर राज्यातील उमेदवार असल्यास क्रॉस व्होट करू, असा निर्धारही महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याचे वृत्त आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com