आजपासून नाशकात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन

केंद्रीय मंत्र्यांसह 700 पदाधिकार्‍यांचा सहभाग
आजपासून नाशकात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून ( Upcoming Elections in Maharashtra)रणशिंग फुंकण्यासाठी येत्या 10 आणि 11 फेब्रुवारीला भाजपचे राज्य अधिवेशन नाशिकला ( BJP State Convention in Nashik)होत आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीची चर्चा होती. मात्र, त्यांच्या दौर्‍याचे नियोजन आलेले नसल्यामुळे शहा यांच्याविनाच अधिवेशन होणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन येथे शुक्रवारी व शनिवारी सातपूर येथील डेमोक्रसी येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनामध्ये पक्षसंघटन बांधणी, पक्षाचे विविध उपक्रम व जिल्हास्तरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करावयाचे सादरीकरण या विषयांवर विशेष संवाद साधला जाणारआहे. पक्षाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष हे मार्गदर्शन करणार असल्याचे महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर भाजपा सरचिटणीस विक्रांत पाटील व महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी आ. बाळासाहेब सानप, माजी शहराध्यक्ष विजय साने, प्रसिध्दीप्रमुख गोविंद बोरसे आदी पदाधिकारी होते. या दोन दिवशीय अधिवेशनात उद्या राज्यातील 200 प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे.या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेदरम्यान प्रदेशातील निमंत्रित 700 हून अधिक प्रतिनिधीं व पदाधिकार्‍यांशी संवाद साधला जाणार आहे.

चर्चेचे मुद्दे

भाजपची विकासाची कामे व विचार राज्यभरात पसरवण्याचा यामागील मुख्य उद्देश असून या बैठकीमध्ये प्रामुख्याने भवन निर्माण, लोकसभेचा प्रवास, स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, धन्यवाद मोदी, लोकसभेच्या प्रवास योजना, फ्रेंडस् ऑफ बीजेपी, नवीन मतदार नोंदणी, युवावरील डेटा व्यवस्थापन व उपयोग, जी-20 परिषदेचे फलित, आर्थिक विकासाच्या दिशा, सोशल मीडियाचा प्रेझेन्स व विधानसभेच्या प्रवासावर महाविजय संकल्प.

प्रमुख उपस्थिती

अमित शहा यांच्या येण्याची चर्चा होती. मात्र, 10 फेब्रुवारीला मुंबईत मोदींचा कार्यक्रम असल्याने कदाचित अमित शहा यांचा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीबाबत मात्र अद्यापपर्यंत स्पष्टता नाही. मात्र, या बैठकीला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, विनोद तावडे, डॉ. भारती पवार, पीयूष गोयल यांची उपस्थिती निश्चित असल्याचे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com