दूध संघात भाजपा-शिंदे गटाचे वर्चस्व

मुक्ताईनगर, पारोळा, बोदवड, धरणगाव, अमळनेर तालुक्यातील लढत ठरली चुरशीची
दूध संघात भाजपा-शिंदे गटाचे वर्चस्व

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गेल्या सात वर्षांपासून जिल्हा दूध संघावर (District Milk Union) असलेले राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे (NCP MLA Eknathrao Khadse) यांचे पर्व आता संपले आहे. जिल्हा दूध संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत (election) भाजपा-शिंदे गट (BJP-Shinde Group) प्रणित शेतकरी विकास पॅनलने 20 पैकी 16 जागांवर विजय (victory) मिळवून महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचा (Farmer Development Panel) दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत सहकार पॅनलचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातून भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तब्बल 76 मतांनी दारूण पराभव केला. आ. मंगेश चव्हाण यांना 255 तर मंदाकिनी खडसे यांना 179 मते मिळाली. मंदाकिनी खडसे यांचा पराभव हा एकनाथराव खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दूध संघात भाजपा-शिंदे गटाचे वर्चस्व
जिल्हा दूध संघातील खडसे पर्वाचा अस्त

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 19 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवारी जळगावातील सत्यवल्लभ सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपही झाले होते. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान आज जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांच्या उपस्थितीत स. 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीला राखीव मतदारसंघाची मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी अंती जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजपा-शिंदे गट प्रणित शेतकरी विकास पॅनलने 16 जागांवर दणदणीत विजय मिळवून सहकार पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडविला. आ. एकनाथराव खडसेंनी नेतृत्व केलेल्या सहकार पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले.

दूध संघातही आ. सावकारेंची बाजी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली होती. केवळ आ. संजय सावकारे यांनी वैयक्तीक उमेदवारी करून संचालक म्हणून निवडून आले होते. आता जिल्हा दूध संघातही आ. संजय सावकारे यांनी शेतकरी विकास पॅनलकडून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून उमेदवारी करून सहकार पॅनलचे श्रावण ब्रम्हे यांचा 115 मतांनी पराभव केला. श्रावण ब्रम्हे यांना 161 तर आमदार संजय सावकारे यांना 276 मते मिळाली.

पूर्वी खडसे आता महाजनांच्या पॅनलमधून शामल झांबरे विजयी

सन 2015 मध्ये आ. एकनाथराव खडसे यांनी केलेल्या सर्वपक्षीय पॅनलमधून शामल अतुल झांबरे ह्या दूध संघावर संचालक म्हणून निवडून गेल्या होत्या. यंदा मात्र शामल झांबरे यांनी खडसे गटाला सोडचिठ्ठी देत मंत्री गिरीश महाजन यांच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये सहभागी होत भुसावळ तालुका मतदारसंघातून सहकार पॅनलच्या शालीनी ढाके यांचा 94 मतांनी दारूण पराभव केला. शामल झांबरे यांना 263 तर शालीनी ढाके यांना 169 मते मिळाली.

देवकरांचीही दूध संघात एन्ट्री

जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात माजी मंत्री गुलाबराव देवकर हे मातब्बर मानले जातात. गुलाबराव देवकर हे सध्या जिल्हा बँकेचे चेअरमन असून दूध संघात त्यांच्या पत्नी छायाताई देवकर यांच्यारूपाने त्यांनी एन्ट्री केली आहे. महिला मतदारसंघातून सहकार पॅनलतर्फे छायाताई देवकर यांनी शेतकरी विकास पॅनलच्या सुनीता राजेंद्र पाटील यांचा 43 मतांनी पराभव केला. छायाताई देवकर यांना 235 तर सुनिता राजेंद्र पाटील यांना 192 मते मिळाली. याच मतदार संघात शेतकरी विकास पॅनलच्या पूनम प्रशांत पाटील यांनी सहकार पॅनलच्या मनिषा सुर्यवंशी यांचा 93 मतांनी पराभव केला. पूनम पाटील यांना 257 तर मनिषा सुर्यवंशी यांना 164 मते मिळाली.

अमळनेरात स्मिता वाघांचा धक्कादायक पराभव

अमळनेर तालुका मतदारसंघात भाजपाच्या माजी आमदार स्मिता वाघ आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यात काट्याची लढत झाली. या लढतीत आमदार अनिल भाईदास पाटील यांनी 62 मतांनी माजी आ. स्मिता वाघ यांचा पराभव केला.

दूध संघात भाजपा-शिंदे गटाचे वर्चस्व
Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान

रावेरातून जगदीश बढेंच्या पराभवानेही खडसेंना धक्का

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचे दूध संघातील कट्टर समर्थक जगदीश बढे यांचा शेतकरी विकास पॅनलचे ठकसेन पाटील यांनी 96 मतांनी दणदणीत पराभव केला. जगदीश बढे यांना 170 तर ठकसेन पाटील यांना 266 मते मिळाली. खडसेंसाठी कायदेशीर लढाई लढणार्‍या जगदीश बढेंचा पराभव हा त्यांच्यासाठी दुसरा धक्का मानला जात आहे.

दूध संघात भाजपा-शिंदे गटाचे वर्चस्व
दूध संघ निवडणुकीत विजय ; मुक्ताईनगरात जल्लोष...

पारोळ्यातील लढत ठरली लक्षवेधी

पारोळा तालुका मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आ. चिमणराव पाटील आणि सहकार पॅनलचे उमेदवार तथा राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यातील लढतही लक्षवेधी ठरली. या मतदारसंघात आ. चिमणराव पाटील यांना 227 तर डॉ. सतीश पाटील यांना 208 मते मिळाली. आ. चिमणराव पाटील यांनी डॉ. सतीश पाटील यांचा 19 मतांनी पराभव केला.

दूध संघात भाजपा-शिंदे गटाचे वर्चस्व
विश्लेषण : दूध संघ निवडणूक संपली आता लढाई सुरू

मुक्ताईनगरातील बालेकिल्ल्यात खडसेंना मोठा फटका

मुक्ताईनगर तालुका मतदार संघ हा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदार संघातून चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघाच्या सात वर्ष चेअरमन राहिलेल्या मंदाकिनी खडसे यांना कडवे आव्हान दिले होते. त्यामुळे या तालुक्याच्या मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मुक्ताईनगर तालुका मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सातपैकी पाच मतदान केंद्रांवर आघाडी घेतली होती. यावेळी मतमोजणीसाठी उपस्थित असलेल्या खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे ह्या मतदान केंद्रातून बाहेर पडल्या. अखेरच्या फेरीअंती आमदार मंगेश चव्हाण यांना 255 तर मंदाकिनी खडसे यांना 158 मते मिळाली. 76 मतांनी आ. मंगेश चव्हाण यांनी मंदाकिनी खडसे यांचा दणदणीत पराभव केला. मंदाकिनी खडसेंचा हा पराभव राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मंत्री गिरीश महाजनांची विजयी घौडदौड

जामनेर तालुका मतदारसंघातून भाजपाचे संकटमोचक मंत्री ना. गिरीश महाजन हे विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका यामध्ये सातत्याने यश मिळवित आले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ना. गिरीश महाजन यांनी सपशेल माघार घेतली होती. या माघारीची परतफेड त्यांनी जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून केली. जिल्हा दूध संघासाठी शेतकरी विकास पॅनलकडून ना. गिरीश महाजन यांनी या मतदारसंघातून उमेदवारी केली. त्यांच्याविरूध्द सहकार पॅनलचे दिनेश पाटील हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. या मतदारसंघात मंत्री गिरीश महाजन यांना 276 तर सहकार पॅनलचे दिनेश पाटील यांना 158 मतदान मिळाले. तब्बल 113 मतांनी दिनेश पाटील यांचा दणदणीत पराभव केला.

महापौरांच्या सासू पराभूत

जळगाव तालुका मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रथमच दूध संघासाठी उमेदवारी करून सहकारात प्रवेश केला. या मतदारसंघातून महापौर जयश्री महाजन यांच्या सासूबाई मालतीबाई सुपडू महाजन यांनी पालकमंत्र्यांविरोधात सहकार पॅनलच्यावतीने उमेदवारी केली. या मतदारसंघातून सुरूवातीपासूनच पालकमंत्र्यांच्या विजयाची शक्यता वर्तविली जात होती. अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना 275 आणि सहकार पॅनलच्या उमेदवार मालतीबाई महाजन यांना 162 मते मिळाली. तब्बल 113 मतांनी मालतीबाई महाजन यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दणदणीत पराभव केला.

राष्ट्रवादीचे पवार भाजपा-शिंदेंच्या पॅनलमधून विजयी

राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी संजय पवार यांनी ‘हवा का रूख’ ओळखून भाजपा-शिंदे गट प्रणित शेतकरी विकास पॅनलमध्ये सहभागी होत अनेकांना धक्का दिला होता. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांना सहकार पॅनलमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यासाठी थेट विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. अजित पवार यांच्याशीही त्यांनी संवाद घडवून आणला. मात्र अटीशर्ती टाकल्यामुळे संजय पवारांनी शेतकरी विकास पॅनलमधूनच उमेदवारी करणे पसंत केले. या सर्व प्रकरणावर आ. एकनाथराव खडसे यांनी तिखट प्रतिक्रिया देत संजय पवारांसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून संजय पवार यांनी या निवडणुकीत विजयासाठी कंबर कसली. धरणगाव तालुका मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलचे संजय पवार आणि सहकार पॅनलचे देवकर समर्थक वाल्मिक पाटील यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत तब्बल 102 मतांनी वाल्मिक पाटील यांचा संजय पवार यांनी पराभव केला. संजय पवार यांना 269 तर वाल्मिक पाटील यांना 167 मते मिळाली.

मी-मी म्हणणार्‍यांना चपराक दूध संघातील शेतकरी मतदारांनी शेतकरी विकास पॅनला कौल दिला असून त्यामुळे सत्ता परिवर्तन झाले आहे.गेल्या सात वर्षापासून दूध, तुप, लोणी खाण्याचे काम सुरु होते. मी-मी म्हणणार्‍यांना या निवडणुकीत चांगलीच चपराक बसली आहे. त्यांनी या निवडणुकीत परभावाचा विचार केला नसेल तसा पराभव त्यांचा झाला आहे. कारण अहंकार वाढला की पराभाव हा होताच असतो.चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण हे आ. खडसेंच्या मतदार संघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडुण आल्याने त्यांचा मतदार संघ त्यांच्या पाठीशी उभा नाही. त्यांनी रडून उपयोग नाही कारण लोकांनीच त्यांना नाकारले आहे. दूध संघातील दूध, तुप, लोणी सर्व पाहिले जाणार असून भविष्यात सर्व गोष्टी बाहेर काढल्या जाणार आहे. तसेच भरती प्रक्रीयेत उमेदवारांकडून 15 ते 20 लाख रुपये घेतले मात्र त्यांना यश आले नाही. त्याची देखील चौकशी केली जाणार आहे. दूध संघात गेल्या काळात मोठा घोटाळा केला असून त्यांनी स्वत:च्या तुमळ्या भरल्या आहेत. परंतु आता शेतकरी विकास पॅनलचा विजय झाल्याने शेतकर्‍यांना सुगीचे दिवस येतील ते सांगण्याची आम्हाला गरज राहणार नाही. तसेच सर्वांशी चर्चा करुन अध्यक्षपद ठरविला जाईल.

मतदारांनी उतरविली माज मस्ती आ. खडसेंचा पराभव मी केला नसून त्यांचा पराभव मी पणाचा आणि जिल्हा दूध संघातील सर्वसमान्य सभासदांनी केला आहे. माझ्या मागे भाजपचे वलय असून ते त्यांच्या मागे नाहीत. प्रत्येक ठिकाणी ते परिवाराला पुढे आणत होते. या विजयामुळे मी भरावून न जाता भानावर राहून काम करेल. दूध संघात काम करतांना आता एकमेकांचे उने दुने न काढता काम करणार आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला असून त्यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास नव्हता. तसेच ते नेहमी दुसर्‍यांना आरोपीच्या पिंजार्‍यात ठेवत असल्याने त्यांचा पराभव झाला आहे. जनतेने त्यांचे दरवाजे बंद करीत माज,मस्ती उतरविली आहे. दूध संघातील पाण्याचे प्रमाण वाढले होते मात्र आता विकासचे नाव हे राज्यभरात पोहचविणार आहोत. तसेच माझा विजय हा विनम्रपणे हा सर्वसमान्य कार्यकर्त्यांचा विजय असून तो मुक्ताईचरणी अर्पण आहे. अध्यक्षपदासाठी मी दावेदार नसून नेते म्हणतील त्यानुसार काम करणार आहे.

खोक्यांच्या वापरामुळेच आमचा पराभव पराभव मान्य करून त्याची कारणे शोधावी लागतील. ही निवडणूक सहकार क्षेत्राच्या इतिहासातील पहिली निवडणूक आहे ज्यात साम, दाम, दंड, भेद असा वापर झाला. फार मोठ्या प्रमाणावर खोक्यांचा वापर केला गेल्याची प्रतिक्रिया सहकार पॅनलचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. आ.एकनाथराव खडसे म्हणाले की, राज्यभरातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती असतांना जळगावच्या दूध संघाची निवडणूक घेण्यात आली. आम्हाला गाफील ठेवण्यासाठी आधी ब्रेक दिला. त्यानंतर पुन्हा स्थगिती उठविली. गेल्या सात वर्षात आम्ही दूध संघात 100 कोटींचा प्रकल्प आणला. सहाजिकच कामाची स्पर्धा करून आता दोन्ही मंत्र्यांनी 200 कोटींचे प्रकल्प आणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. याठिकाणी एकनाथ खडसे एका बाजूला आणि समोर दोन दोन मंत्री, पाच आमदार, दोन खासदार असा संघर्ष या निवडणुकीत झाला. काही ठिकाणी सहकार पॅनलच्या उमेदवारांचा कमी मतांनी पराभव झाला. राज्याचे कामकाज सोडून दोन दोन मंत्री उमेदवारी करतात. पराभव स्विकारूनच मी चालतोय. जिल्हा दूध संघात अत्यंत पारदर्शक काम करूनही आम्ही काही गोष्टीत कमी पडलो. खोक्यांमध्ये आम्ही कमी पडलो. आमच्या काही त्रृटी असतील त्याचा परिणाम पराभवावर दिसतोय. सत्ताधार्‍यांकडून सत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. जिल्हा दूध संघात आता नवीन संचालकांनी चांगला कारभार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य करून चालावे लागेल. एखाद्या अपयशाने थकणारा मी नसल्याचेही आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

हो आम्ही खोके वाटले, पण कप-बशीचे जिल्हा दूध संघात खोके वापरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसेंनी केला. या आरोपावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही जोरदार पलटवार करीत ‘हो आम्ही खोके वाटले, पण कप-बशीचे’ अशा शब्दात प्रतिक्रिया नोंदविली. जिल्हा दूध संघातील विजयाबाबत बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मी प्रथमच सहकार क्षेत्राची निवडणूक लढलो आहे. वर्षभरात या दूध संघाच्या प्रगतीत नक्कीच फरक दिसेल. दूध संघातील तूप नेमके सातार्‍याला कसे जाते हे देखिल आम्ही पाहणार असल्याचा टोला त्यांनी खडसेंना लगावला. आमचा कुठल्याही जमिनीवर डोळा नाही. दूध संघाच्या प्रगतीसाठी मी आणि मंत्री गिरीश महाजन असे संयुक्तपणे लक्ष ठेऊन राज्य असो की केंद्र सरकार यांच्याकडून निधी आणण्याचे काम पुढच्या काळात केले जाईल. आम्हाला गद्दार म्हटले गेले. गद्दार पुन्हा निवडूनच येणार नाही अशा वल्गना केल्या गेल्या. मात्र दूध संघाच्या निकालाने या आरोपांना जोरदार चपराक दिली आहे. दूध संघ वाचविण्यासाठीच आम्ही याठिकाणी उमेदवारी केली. मतदारांनीही आमच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे शेतकरी विकास पॅनलचे 16 उमेदवार निवडून आले. ज्यांनी दूध संघात भ्रष्टाचार केला त्यांची चार माणसे जेलमध्ये गेली. मग ही जबाबदारी कुणाची? असा सवाल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. निवडणूक आज संपली आहे असे म्हणता येणार नाही. कारण दूध संघात आम्ही काही करू तेव्हाच आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाऊ असेही ना. पाटील यांनी सांगितले. वर्षभरात दूध संघात विकास न झाल्यास मी राजीनामा देईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com