भाजपला स्वगृहातून विरोधाचे खडे बोल

लोकप्रतिनिधीच्या ‘अविश्वास’ भूमिकेचे खापर प्रशासनावर
भाजपला स्वगृहातून विरोधाचे खडे बोल

नाशिक । Nashik - फारुक पठाण

मुख्यमंत्री (Chief Minister) असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीत (municipal elections) नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केल्याने नाशिककरांनी कधी नव्हे इतके तब्बल 66 नगरसेवक निवडून देत नाशिक मनपाचा कारभार भाजपकडे (BJP) सोपवला. मात्र पाच वर्षे संपता-संपता पक्षातील अंतर्गत कुरबुर थेट मीडियापर्यंत पोहोचत आहे.

महापालिकेत सत्ता असूनसुद्धा पक्षातीलच बडे नेते आंदोलनाची भाषा करीत आहेत तर आमदार महापौरांना पत्र न देता थेट आयुक्तांना पत्र देतात. यामुळे आपल्याच पक्षाच्या महापौरांवर एक प्रकारे अविश्वास दिसून येत आहे. यामुळेच तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. प्रशासन नीट काम करत नसल्याने लोकप्रतिनिधी अशी भूमिका घेत असल्याचा दावा भाजप नेते करीत आहे.

नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (Bhartiya Janata Party) विरोधी पक्षांचे आरोप सुरू असतातच, मात्र गत काही दिवसात पक्षातीलच काही बडे नेत्यांनी आवाज बुलंद करुन आपल्याच पक्षाच्या महापौरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. मध्य नाशिकचे आमदार तथा प्रदेश भाजप सरचिटणीस देवयानी फरांदे (State BJP general secretary Devyani Farande) यांनी डेंग्यू (Dengue), चिकनगुनिया (Chikungunya) सारखे साथीचे रोग (Epidemic diseases) शहरात वार्‍यासारखे पसरत आहेत.

लोकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. असे असले तरी मनपाचे आरोग्य विभाग (Department of Health) झोपेत आहे का,असा प्रश्न उपस्थित करुन कारभार न सुधारल्यास थेट आरोग्य विभागालाच टाळे ठोकणार असा इशारा दिला होता, यावर आ. फरांदे थांबले नाही तर मनपाच्या वतीने जे शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे ते निकृष्ट दर्जा असल्याचा आरोप करीत काही ठिकाणी खड्डयांमध्ये माती टाकण्यात आल्यानंंतर त्वरीत ती बाहेर पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे या संपुर्ण ठेक्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. विशेष म्हणजे याबाबतचे पत्र मनपा आयुक्त कैलास जाधव यांना देऊन ते मिडियापर्यंत आले. तर दुसरीकडे महापालिका महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वाती भामरे यांनी देखील नुकत्याच झालेल्या महासभेतच कामे होत नसल्याची तक्रारी करत उपोषणाचा इशारा दिला.

समितीच्या वतीने महिलांना प्रशिक्षण देण्यासाठीचा ठेका मागच्या महिन्यात ऐन वेळी रद्द करण्यात येऊन नव्याने निवीदा प्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले होते. यामध्ये पाच पैकी एक ठेकेदार पात्र ठरवूनही पक्षातीलच काही अंतर्गत वादामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती. दुसरीकडे कार्यकाळ संपत आला तरी कामे मार्गी लागत नसल्याने भामरे यांनी संताप व्यक्त करीत आपल्याच पक्षाच्या सत्तेविरुध्द उपोषण करण्याचा इशारा भर महासभेत दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पक्षांतर्गत सर्वकाही व्यवस्थित आहे. एका घरात पाच लोक असले तरी काही प्रमाणात कुरबुर होतेच. मात्र आम्ही भाजपचे सर्वजण मिळवून काम करीत असून नाशिकच्या भल्यासाठी काम करीत राहणार. डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत असून मागील 4-5 वर्षांतील आताची आकडेवारी उच्चांंकी आहे. अशा वेळी आ. फरांदे यांनी मांडलेला विषय वस्तुस्थिती आहे. मलेरियाबाबत ज्या कंपनीला काम देण्यात आले आहे त्यांची चौकशी सुरू आहे.

- सतीश कुलकर्णी, महापौर

मनपात आयुक्तांना खूप अधिकार आहेत, तसे अधिकार लोकप्रतिनिधींना नाही. मात्र ते राज्य शासन व पालकमंत्र्यांना बांधील असल्याचे दिसतात. आम्ही मनपात सत्तेत असूनही भाजपला आयुक्तांचे सहकार्य मिळत नाही. नाशिक महापालिकेचा व्याप वाढला आहे. नागरी समस्यांचा स्वरुप वेगवेगळ्या पध्दतीने उग्र रुप धारण करीत आहे. यामुळे लोकप्रतिनिधींकडून लोकांच्या अपेक्षा देखील खूप वाढल्या आहेत. यामध्ये प्रशासनाची भुमिकादेखील मोठी आहे. नागरी समस्या हे राजकीय विषय नाही, लोकप्रतिनिधींनी प्रशासनाशी बोलणे म्हणजे पक्षांतर्गत वाद होत नाही. प्रशासन,आयुक्त यांचे सहकार्य पाहिजे. तसे होत नसले तरी आमची जनहिताची काम सुरू आहेत आणि ती करत राहणार.

- लक्ष्मण सावजी, भाजप, ज्येष्ठ नेते

Related Stories

No stories found.