
नाशिक | Nashik
भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर शिवशक्ती परिक्रमा (Shivshakti Parikrama) सुरू केली असून या परिक्रमेदरम्यान त्या महाराष्ट्रातील (Maharashtra) ज्योतिर्लिंग आणि महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे दर्शन घेत आहेत. काल मंगळवार (दि.०६) रोजी त्यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा दुसरा दिवस होता. यावेळी त्यांनी सकाळी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे जाऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले...
त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. यावेळी त्यांनी सिन्नर (Sinner) तालुक्यातील नांदूरशिंगोटे (Nandoor Shingote) येथे भेट दिली. त्यावेळी येथील गोपीनाथ गडावर जाऊन पंकजा मुंडे यांनी अभिवादन केले. यानंतर मुंडे यांनी एकलव्य आदिवासी वस्तीत जाऊन एका कुटुंबासोबत चुलीवरील जेवणाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे, पंकजा मुंडे यांनी चुलीजवळ बसून बाजरीच्या भाकरी (Millet Bread) देखील तव्यावर भाजल्या. पंकजा मुंडेंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पंकजा मुंडे यांनी शिवपरिक्रमा यात्रेदरम्यान नांदूरशिंगोटे येथील कार्यक्रमात आदिवासी महिलांसोबत (Tribal Women) सुंदर अशा नृत्यावर फेर धरून त्यांना साथ दिली. यानंतर एकलव्य आदिवासी वस्तीतील देवराम आगिवले या आदिवासी कुटुंबाकडे पंकजा मुंडे जेवणासाठी गेल्या होत्या. यावेळी मुंडे यांनी चुलीजवळ बसून बाजरीच्या भाकरी थापल्या. तसेच मुंडे यांच्यासाठी स्वयंपाक बनवणाऱ्या मथुराबाई आगिवले, जयश्री आगिवले, सुलाबाई पथवे, गीता आगिवले यांनी त्यांना ठाकर समाजातील शेंगदाण्याची चपाती बनवून दाखवली. त्यानंतर पंकजा मुंडेंनी भाकरी पिठले, कुळथाचे शेंगोळे, मटकी, ठेचा, झिरके, शेंगदाण्याची पोळी अशा भोजनाचा आस्वाद घेतला.
दरम्यान, यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, २०१९ ला मी शिवशक्ती परिक्रमा काढण्याचे ठरवले होते. मात्र, त्यावेळी मला शक्य झाले नाही. गोपीनाथ मुंडेंना जसे जनतेचे प्रेम मिळाले तसेच प्रेम मलाही मिळाले, मिळतं आहे हे पाहून मी भारावून गेले आहे. तसेच मी कुणाला डरणारी नसून स्वाभिमानाने राहील आणि स्वाभिमानाने जगेल असे पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटले.