
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. शिवाय त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत आता जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. तर आव्हाडांच्या राजीनाम्याच्या निर्णयास गृहमंत्री फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसाल प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.
जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणे आणि त्यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा यांचा काय संबंध आहे. जितेंद्र आव्हाड निर्दोष असतील तर त्यांनी कायदेशीरपणे आपली बाजू लढवावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानात प्रत्येकाला निर्दोषत्त्व सिद्ध करण्याची मुभा आहे. जेव्हा निर्दोषत्त्व सिद्ध करता येत नाही तेव्हा असे वेडेचाळे केले जातात.
आव्हाडांच्या राजीनाम्याचा आणि त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा काहीही संबंध नाही. जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. आम्ही ती जागा जिंकू, असे आशिष शेलार यांनी म्हटले. त्यामुळे आता शेलार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.