
पुणे |Pune
भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधन झाल्यानंतर येथील जागा रिक्त झाली आहे. पुढील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना जवळपास एक वर्षांहून अधिक कालावधी बाकी आहे त्यामुळे या मतदारसंघात येत्या सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक (By-elections) होणे क्रमप्राप्त आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्याच्या खासदारकीसाठी भाजपच्या (BJP) वतीने कोणाचे नाव पुढे केले जाते यासाठी राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे, दरम्यानच्या काळात काही इच्छुकांनी तर मोर्चेबांधणी केल्याचेही समजते आहे; तर काही नेत्यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्याला भावी खासदाराचे लेबल लावत त्या आशयाचे फलकही झळकवले आहेत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या जागेवर आता पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा सुरू असल्याचे समजते आहे.
भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे मविआकडून कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, भाजपच्या या तीन जणांपैकी कोणाचे नाव तिकिटासाठी निश्चित होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे; पण कसबा विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपकडून झालेली चूक त्याबरोबरच पारंपारिक मतदार यांना न दुखावता या पोटनिवडणुकीला भाजप मुत्सद्दीपणे सामोरे जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.