VIDEO : भर उन्हाळ्यातही नांदूरमध्यमेश्वरला पक्ष्यांचा किलबिलाट

VIDEO : भर उन्हाळ्यातही नांदूरमध्यमेश्वरला पक्ष्यांचा किलबिलाट

नाशिक ,निफाड । प्रतिनिधी Nashik, Niphad

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात भर उन्हाळ्यातही पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींसह पर्यटक या अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. रामसरचा दर्जा प्राप्त झाल्याने या अभयारण्याची ओळख संपूर्ण देशात आहे. नांदूरमधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. नांदूरमध्यमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळतात.

रणरणत्या उन्हातही नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. उन्हाळ्यात भरघोस पाणी असल्याने माघारी परतणारे पक्षी याच ठिकाणी घरटे करून राहत आहे, ही नक्कीच आशादायक बाब म्हणावी लागेल. नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात सध्या पक्षी स्थानिक आहे. हिरवाई व पाणी असल्याने पक्ष्यांनी येथेच अंडी टाकण्याची तयारी सुरू केली आहे. पक्ष्यांचा आधिवासी टिकविण्यासाठी मोलाचा वाटा येथील पक्षीप्रेमी गंगाधर आघाव यांनी उचलला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा पाणी टिकून आहे. इतरवेळी मात्र पाणी नसले की पक्षी स्थलांतर करतात. मात्र, मागीलवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात आहे. साहजिकच आजूबाजूला निसर्ग सौंदर्याने मनसोक्त उधळण केल्यामुळे परिसरातील झाडांवर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास पहायला मिळतो.

पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याने पाच वर्षांपूर्वी एक मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेला यश आले असून, 9 पक्ष्यांनी अंडी उबवली. त्यानंतर या पक्ष्यांची संख्या वाढली आहे. पाचव्या वर्षी 125 हून अधिक पक्ष्यांनी आपली घरटी बांधली आहे. त्यामुळे पक्षी अभयारण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे पक्षीप्रेमी गंगाधर आघाव यांनी सांगितले. या पक्ष्यांमध्ये कमल पक्षी, नांदूरमध्यमेश्वरची राणी म्हणून ओळख असलेला पक्षी जवळपास चार ते पाच हजारांच्या संख्येने येथे पाहायला मिळतो. वारकरी नावाचा पक्षीदेखील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

तांबडा बगळा, राखी बगळा, हळदी कुंकू, कापसी बदक आदींसह इतरही पक्षी बाराही महिने अभयारण्याच्या परिसरात पाहायला मिळतात. तांबड्या गाठीची टिटवी देखील याठिकाणी पाहायला मिळते. टिटवी सुरक्षित जागा शोधते. त्यामुळे पर्यटक अभयारण्यात प्रवेश करताच टिटवी आवाज करते. पक्षी निसर्गतःच सुरक्षित जागा शोधतात, याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. रिव्हर्टर पक्षीदेखील या ठिकाणी आहे. परंतु, या पक्ष्याला येथील जागा सुरक्षित वाटली नसावी म्हणून त्याने स्थलांतर केले आहे. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याला निसर्ग सौंदर्य लाभल्यामुळे येथे आजही असंख्य पक्ष्यांचा अधिवास आहे. हे चित्र यापुढे जपले जावे व रामसरचा दर्जा टिकून राहावा, हीच अपेक्षा!

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

हिवाळ्यात पक्ष्यांचे आगमन

येथे मुग्धबलाक (ओपन बिल्ड स्टॉर्क), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), पाणकावळा, काळे कुदळे, खंडया, गाय बगळे, जांभळी पाणकोंबडी, राखी बगळा, पर्पल हेरॉन, युरेशियन कूट, हळद कुंकू बदक हे स्थानिक पाणपक्षी आढळतात. या जलाशयाच्या परिसरात जांभळी पाणकोंबडी मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने तिला नांदूरमध्यमेश्वरची राणी म्हटले जाते. तसेच, येथे टिल, पोचार्ड, विजन, गडवाल, थापट्या, पिनटेल, गारगनी, कॉटन पिग्मी गूज ही विविध प्रकारची बदके हिवाळ्यात स्थलांतर करून येतात. त्याशिवाय गॉडविट, सँड पायपर (तुतवार), क्रेक, रफ, स्मॉल प्रॅटीनकोल हे दलदलीत आढळणारे स्थलांतरीत पक्षीसुद्धा येतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com