Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याजि. प. सेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची

जि. प. सेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) सेवकांना आता बायोमेट्रीक मशीनव्दारे (Biometric machine) हजेरी (Attendance) द्यावी लागणार आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी बायोमेट्रीक हजेरी कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते…

- Advertisement -

करोना (Corona) संकट कमी झाल्यामुळे प्रशासनाने बायोमेट्रीक मशीन बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या असून खासगी कंपनीकडून हे मशीन बसविले जाणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून मुख्यालयात सेवकांना बायोमेट्रिकव्दारे हजेरी द्यावी लागणार आहे. बायोमेट्रिक हजेरी सक्ती केल्यामुळे सेवकांचे धाबे दणाणले आहे.

सेवक कार्यालयीन वेळेत येत नसल्याने गेल्याच महिन्यात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर (Balasaheb Kshirsagar) यांनी सर्व विभागांना अचानक भेटी देऊन हजेरी पत्रक व हालचाल पत्रकाची तपासणी केली. यावेळी सर्व विभागातील ५० हून अधिक सेवक कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले होते.

या लेटलतिफांना नोटीस बजाविण्यात आली होती. दुसरी लाटेपूर्वी फेब्रुवारी महिन्यातही मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही अचानक कार्यालयांना भेटी देऊन सेवकांची हजेरी घेतली होती. यातही तब्बल १४३ सेवक लेटलतिफ सापडले होते. उशीराने येणाऱ्या सेवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात जळगव जिल्हा परिषदेच्या धर्तीवर बायोमेट्रिक हजेरी बसविण्यात आली.

विभागीय आयुक्तालयानंतर, विभागातील सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये बायोमेट्रिक हजेरी बसविण्यात यावी अशा सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या होत्या. या आदेशाची अंमलबजावणी करायला प्रशासनाने सुरूवात केली. मात्र, जिल्हयात करोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आली. त्यामुळे ही प्रक्रीया रखडली होती.

करोनाची दुसरी लाट ओसरली आहे. शासकीय कार्यालय पूर्ववत सुरू झाले आहेत. कार्यालये सुरु झाल्यानंतरही अनेक सेवक कार्यालयीन वेळेत येत नसल्याचे दिसत आहे. तर, अनेक सेवक कार्यालयीन वेळेत वैयक्तीक कामांसाठी बाहेर जात असल्याच्या तक्रारी होत्या. कामाच्या वेळात सेवक वेळ वाया घालवत असल्याचे प्रकारही अनेकदा दिसले. पाच दिवसांचा आठवडा केला असून कार्यालयीन वेळेत देखील बदल केला आहे.

शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ पर्यत केली खरी. मात्र, तत्पूर्वीच कर्मचारी गायब होत असल्याचे प्रकारही अनेकदा घडले. त्यामुळे प्रशासनाने रखडलेल्या बायोमेट्रीक कार्यप्रणाली कार्यन्वीत करण्याचा निर्णय घेतला आहे. एका खाजगी कंपनीकडून बायोमेट्रीक मशीन मागविण्यात आले असून, ते लवकरत बसविले जाणार आहे. साधारण १ डिसेंबरपासून मुख्यालयातील ३५० कर्मचाºयांची हजेरी बायोमेट्रीकव्दारे सुरू होणार आहे.

विभागीय आयुक्त यांनी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही प्रक्रीया रखडली होती. परंतू, आता ही कार्यप्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. पहिल्या टप्यात मुख्यालयात ही प्रणाली सुरू होईल. तर, नवीन वर्षात सर्व पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली जाईल.

आनंद पिंगळे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन जि. प.)

- Advertisment -

ताज्या बातम्या