
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. मुंबई महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवक नेमण्याची तरतूद होती. त्यात आता वाढ होउन दहा स्वीकृत नगरसेवक नेमता येतील. तर इतर महापालिकांमध्ये दहा किंवा एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के जी कमी असेल ती संख्या स्वीकृत नगरसेवक नेमता येणार आहेत.
स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढविण्याबाबतचे विधेयक गुरूवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. महाविकास आघाडीकडून ही केवळ राजकीय सोय असल्याचे कारण देत विरोध करण्यात आला.
मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधानसभेत मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२३ मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, अमिन पटेल, ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी आपली मते मांडली. हे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका या सर्व आमदारांकडून करण्यात आली.
तर शहरांचा गुणात्मक विकास व्हावा, या हेतूने हे विधेयक मांडल्याचे उदय सामंत म्हणाले. या स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार राहणार का असा प्रश्न यावेळी विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर ही सुधारणा केवळ संख्या वाढविण्यासाठी आहे. याबाबतच्या इतर कोणत्याही नियमात बदल झालेला नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.