
निफाड | Niphad
तालुक्यातील सहा विविध कार्यकारी सहकारी संस्थांबाबत उच्च न्यायालयात २८ एप्रिलला सुनावणी होणार आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीसाठी याच दिवशी मतदान होणार असल्याने आमदार दिलीप बनकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आमदार बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
त्यातच आमदार दिलीप बनकर यांनी स्थापन केलेल्या सहा सहकारी सोसायट्यांमधील ७८ जागा सहकार निबंधकांनी अपात्र ठरविल्या होत्या. यावर आमदार बनकर यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर उच्च न्यायालयात १० एप्रिलला सुनावणी होणार होती.
मात्र, काही कारणास्तव ती लांबली. दरम्यान, गुरुवारी (दि. १३) न्यायालयाने २०२१ साली याच सोसायट्यांच्या अपिलावर इतका उशिर झाला, तर या अपिलावर सुनावणीसाठी इतकी घाई का, असा प्रश्न उपस्थित करीत या अपिलावर २८ एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे सांगितले.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि सुनावणी देखील याच दिवशी होणार आहे. त्यामुळे या सहा सोसायट्यांमधील ७८ मतदारांना मतदानाचा अधिकार मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.