एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्य परिवहन महामंडळ ( MSRTC )अर्थात एसटी कर्मचा-यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. याचा फायदा सुमारे ९० हजार एसटी कर्मचा-यांना होईल. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे १५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. एसटी कर्मचा-यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे राज्य सरकारला तातडीने हा निर्णय घ्यावा लागला.

महागाई भत्ता तातडीने लागू करावा या मागणीसाठी एसटी महामंडळातील संघर्ष एसटी कामगार युनियन, एसटी कर्मचारी काँग्रेस, एसटी कामगार संघटना आणि एसटी कामगार सेना अशा सर्व सर्व संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळतो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के तर एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळत होता. पण गेल्या चार महिन्यांपासून महागाई भत्त्याबाबत निर्णय प्रलंबित होता. एसटी कर्मचा-यांना राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे ३४ टक्के महागाई भत्ता देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण महामंडळाची बैठकच होत नव्हती.

सध्या मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने एसटी संचालक मंडळाची बैठकही रखडली होती. महागाई भत्त्याचा निर्णय होत नसल्याने कामगार संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला एसटीच्या महागाई भत्त्याचा निर्णय घ्यावा लागला.

कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढल्याने महामंडळावर १५ कोटी रुपयांचा बोजा पडेल असा प्राथमिक अंदाज आहे. एसटी कर्मचा-यांच्या वेतनाचे पैसेही सध्या राज्य सरकारकडून दिले जातात. त्यामुळे वाढीव महागाई भत्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली जाईल. वाढीव महागाई भत्ता कधी द्यायचा आणि थकबाकीचा विषय महामंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com