Photos # धुळ्यात पोलिस आणि अतिरेक्यांमध्ये मोठी धुम:चक्री

Photos # धुळ्यात पोलिस आणि अतिरेक्यांमध्ये मोठी धुम:चक्री

धुळे dhule । प्रतिनिधी

दुपारी बारा साडेबाराची वेळ... रोजच्या प्रमाणे धुळे बस स्थानक प्रवाशांनी आणि एस.टी. बसेसेने गजबजून गेले होते. प्रवाशाी इच्छीत बस शोधत स्थानकात फिरत होते. महिला, मुले, तरूण, वयोवृध्द असे सारेच प्रवाशी होते. आणि अचानक... हातात बंदुक घेवून तोंडाला रुमाल बांधलेले दोन जण स्थानकात खुलेआम पणे शिरले. आणि पाहता पाहता प्रवाशांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांना ताब्यात घेत जीवे ठार मारण्याची धमकी देऊ लागले. अचानकपणे झालेल्या या घटनेमुळे सार्‍या स्थानकात मोठा गोंधळ उडाला. जो तो जीवाच्या आकांताने सैरभैर पळू लागला. काय होतेय हे काहीच कळत नव्हते. आणि... समजले ते दोन अतिरेक्यांनी (militants) दोन प्रवाशांसह एका पोलिसालाही (police) ताब्यात घेेतले. पोलिसालाही अतिरेक्यांनी ताब्यात घेतल्याचे दिसताच प्रवाशांची मात्र चांगलीच धांदल उडाली.

धुळ्यात अतिरेकी शिरल्याची बातमी सर्वत्र पसरली. धुळे बसस्थानकावर अतिरेक्यांनी तीन प्रवाशांना वेठीस धरले. यामुळे प्रवाश्यांचा थरकाप उडाला. ही माहिती कंट्रोल रुमला मिळताच पोलिसांची कुमक दाखल झाली. यावेळी रेस्क्युसाठी पुढे आलेल्या एका पोलिसालाही अतिरेक्यांनी बंदी बनविले. त्यामुळे थरकाप उडाला. अतिरेकी विरुध्द पोलीस असा थरार सुमारे अर्धा तास रंगला. यावेळी संपूर्ण बसस्थानकाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले.अखेर पोलिसांनी अतिरेक्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी शस्त्र खाली ठेवले. ओलीस असलेल्यांची यशस्वी सुटका करण्यात आली. या घटनेनंतर धुळ्यात अफवांचा बाजार उठला. मात्र, हा प्रकार म्हणजे धुळे पोलिसांनीच रचलेला मॉक ड्रील असल्याचे उघडकीस आले. तेव्हा सार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कुठल्याही आपत्कालिन स्थितीला तोंड देतांना स्थिती हाताळावी लागेल. यासाठी प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक किशोर काळे व सहायक पोलीस अधीक्षक एस.ऋषिकेश रेड्डी यांनी बसस्थानक परिसरात मॉक ड्रील घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार आज दुपारी 12.19 वाजेच्या सुमारास धुळे बसस्थानकाच्या आवारात दोन डमी अतिरेकी पाठविण्यात आले. त्यांनी तेथील तीन प्रवाशांना ओलीस ठेवण्याचा बनाव रचण्यात आला. या घटनेची माहिती कंट्रोल रुमद्वारे पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांची कुमक बसस्थानकात दाखल झाली. त्यात सुमारे 70 ते 80 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश होता. पोलिसांनी अत्यंत शिताफीने मॉक ड्रील पार पाडत अतिरेक्यांना ताब्यात घेतले. यातून धुळे पोलीस दलाची सज्जता दिसून आली.

मॉक ड्रीलमध्ये प्रभारी पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, पोलीस उपअधीक्षक शिवाजी बुधवंत, एलसीबीचे पीआय हेमंत पाटील, दहशतवाद विरोधी शाखेचे सपोनि योगेश राजगुरु, दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार, शिघ्रकृती दल, दंगल विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, अंगुली मुद्रा व तपासणी पथक, स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, जिल्हा रुग्णालय, फायर ब्रिगेड व्हॅन अधिकारी व कर्मचारी तसेच शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे बसस्थानकात मॉक ड्रील करण्यात आले. दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस दलाची सज्जता पाहणे हा उद्देश होता. दोन डमी अतिरेकी आम्ही तेथे पाठविले होते. व एका अपहृत पोलिसाचा समावेश होता. या मॉक ड्रीलमध्ये पोलिस दलाने त्यांची यशस्वी सुटका केलेली आहे. तसेच अतिरेक्यांना पकडून पोलिस ठाण्यात पुढील कार्यवाहीसाठी पकडून नेले. अशाप्रकारे अतिरेकी शिरल्याची किंवा ओलीस ठेवण्याची घटना घडल्यास सदर परिस्थिती कशाप्रकारे हाताळू शकतो, याचे प्रात्यक्षिक अ‍ॅण्टी टेररीस्ट स्कॉड, बॉम्ब शोधक पथक, आरसीपी तसेच संपूर्ण डीव्हीजनल इन्जार्च यांच्या माध्यमातून करण्यात आले.

किशोर काळे, अपर पोलिस अधीक्षक, धुळे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com