करंजवण पाणीपुरवठा योजनेचे आज भूमीपूजन

करंजवण पाणीपुरवठा योजनेचे आज भूमीपूजन

मनमाड । प्रतिनिधी Manmad

आ.सुहास कांदे (MLA Suhas Kande )यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या मनमाड ( Manmad)शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणारी तब्बल 311 कोटीच्या करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या(Karnjavan Water Supply Scheme ) भूमिपूजन आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde)यांच्या हस्ते होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मनमाडकरांची पाणीटंचाई कायमस्वरूपी संपुष्टात आणणार्‍या या ऐतिहासिक सोहळ्यात उद्योग मंत्री उदय सावंत, पालकमंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.शहरातील भगवान ऋषीं वाल्मिकी स्टेडियमवर होणार्‍या या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून या योजनेमुळे शहराचा नक्कीच कायापालट होईलच शिवाय औद्योगिक वसाहतीमुळे बेरोजगारांच्या हाताला काम देखील मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

नाशिक जिल्ह्यात मालेगावनंतर मनमाड हे एकमेव मोठे शहर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून शहरातील सव्वालाख नागरिक भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहे. दळण वळणाची सर्व साधने उपलब्ध असतांना देखील केवळ पाण्याअभावी या शहराचा विकास खुंटला आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. सुहास कांदे यांनी तुम्ही मला निवडून द्याल मी पाणीप्रश्न हमखास मार्गी लावेल, असे आश्वासन दिले होते. जनतेने त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी शासन दरबारीं प्रलंबित असलेल्या करंजवन पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या योजनेला शासनाने केवळ हिरवाकंदीलचं दिला नाही, तर त्यासाठी निधींची तरतूददेखील केली.

काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमाडला येऊन योजेनेच्या कामाची निविदेची प्रत प्रसिद्ध केली होती. त्यानंतर योजनेच्या कामाची निविदा ठेकेदाराने भरल्यानंतर योजनेच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. मात्र पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती, त्यामुळे त्यावेळी कामाचे भूमिपूजन करता आले नव्हते. आचारसंहिता संपल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करंजवन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपुजनासाठी सोमवारी येत आहे त्यांच्या सोबत औद्योगिक मंत्री उदय सावंत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत येणार असल्यामुळे मंत्री सामंत मनमाडसाठी एमआयडीसी तर मंत्री सावंत उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा सेंटरचीं घोषणा करणार आहे.

या व्यतिरिक्त मनमाड, नांदगाव शहरासोबत मतदारसंघाच्या विकासा साठी मुख्यमंत्री अनेक योजनाचीं घोषणा करण्याची शक्यता आहे. सकाळी साडेदहा वाजता होणार्‍या या कार्यक्रमासाठी आ. सुहास कांदे आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्टेडियमवर भव्य शेड उभारण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लागले असून या कार्यक्रमात अलोट गर्दी होणार असल्यामुळे नागरिकांचीं कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांनी कार्यक्रमस्थळी येऊन पाहणी केली. मनमाड, नांदगावशहरासोबत संपूर्ण तालुक्यातील जनतेचीं या कार्यक्रमाबाबत उत्सुकता वाढली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com