बीएचआर पतसंस्था घोटाळा : दिग्गजांच्या अटकेने धाबे दणाणले

बीएचआर पतसंस्था घोटाळा : दिग्गजांच्या अटकेने धाबे दणाणले

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज गुरुवारी पहाटेच कारवाईचा दुसरा दणका दिला आहे. अंत्यत नियोजनबद्ध व गोपनीय पध्दतीने पहाटेच्या सुमारास एकाचवेळी जिल्ह्यातील संशयितांना अटकेची कारवाई करण्यात आली.

जळगाव शहरातून भागवत भंगाळे, संजय तोतला, तर जामनेर येथून राजेश लोढा, छगन झाल्टे, भुसावळातून आसिफ मुन्ना तेली तर पाळधी येथून जयश्री शैलेश मनीयार यांना ताब्यात घेण्यात आले.

तर जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात येवून जामनेर येथे चौकशीसाठी आणण्यात आले.

एकाचवेळी जळगाव जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, राजकारणी अशा दिग्गज आठ जणांच्या अटकेच्या कारवाई जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

कोण आहेत अटकेतील संशयित

छगन झाल्टे

जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती , भाजपचे माजी नगरसेवक व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक

जितेंद्र पाटील

जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे सचिव , शेतकर्‍यांच्या आत्मा समितीचे अध्यक्ष , त्यांच्या पत्नी जामनेर नगरपालिकेत भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत..

राजेश लोढा

जामनेर तालुक्यातील तळेगाव शिक्षण संस्थेचे सचिव तसेच भाजपयुमोचे कार्यकर्ते

भागवत भंगाळे

जळगाव शहरातील हॉटेल व्यवसायातील मोठे व्यक्तिमत्त्व , जळगाव शहरातील सिल्वर पँलेस हॉटेलचे मालक, भंगाळे गोल्डचे संचालक

प्रेम कोगटा

दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष तथा कोगटा ग्रुप उद्योग समूहाचे संचालक

आसिफ मुन्ना तेली

भुसावळ नगरपालिकेचे तत्कालीन गटनेते व भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना तेली यांचे सुपुत्र

संजय तोतला

जिल्ह्यातील मोठे उद्योजक, पाळधीला पेट्रोलपंप

जयश्री तोतला

राज्यभरात गाजलेल्या नाफ्ता प्रकरणातील आरोपी अंतिम तोतला यांच्या पत्नी

जयश्री मणियार

प्लास्ट या कंपनीचे मालक मोठे उद्योजक श्रीकांत मणियार यांच्या सूनबाई

40 हून अधिक पोलीस अधिकर्‍यांचा ताफा

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास जळगाव शहरात दाखल झाले. कारवाईसाठी स्वतंत्र 15 पथके तयार करण्यात आली होती.

यात 5 पोलीस निरिक्षक, 4 सहाय्यक पोलीस निरिक्षक, 3 पोलीस उपनिरिक्षक आणि 30 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

एका पथकात एक अधिकारी व चार कर्मचारी याप्रमाणे स्वतंत्र गाड्यांमध्ये पथक जिल्ह्यात रवाना करण्यात आले. तब्बल 15 ते 16 हून चारचाकी स्वतंत्र वाहनांमध्ये कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाले.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके हे पुण्यातून प्रत्येक पथकावर मॉनिटरींग करत होते. तसेच पथकाला आवश्यक त्या सुचना व आदेश करत होत्या.

पहिल्यादांच गुन्ह्यात महिलांना अटक

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत अनेक पुरूष संशयितांनाच अटक झाली आहेत. काही अद्याप फरार आहे. पहिल्यांदाच महिलांना अटक करण्यात आली आहे. यात पाळधी येथून जयश्री मणीयार यांना तर मुंबई येथून जयश्री अंतीम तोतला यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या महिलांच्या पथकाने अटक केली आहे.

मार्निंग वॉक करतांनाच घेतले ताब्यात

नियोजनानुसार प्रत्येकाला नेमून दिलेल्या संशयित व त्याला अटक करण्याच्या जबाबदारीनुसार पथक रवाना झाले. यात दोन पथकांकडून जळगाव शहरात साडे सहा वाजेच्या सुमारास भागवत भंगाळे यांना त्याच्या जिल्हापेठ परिसरातील गांधी नगरातील निवासस्थानाहून पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तब्बल तीन तास त्यांची चौकशी करण्यात येवून अटकेची नोंद करण्यात आली.

याचदरम्यान दुसरीकडे रवाना झालेल्या पथकाने संजय तोतला यांचे न्यायालयाच्या मागीच बाजूस शाहू नगरातील सहयोग क्रिटीकल केअरजवळील घर गाठले. मात्र संजय तोतला घरी नव्हते. ते मॉर्निक करायला बिगबाजार परिसरात गेले असल्याचे पथकाला कुटुंबियांकडून सांगण्यात आले. या माहितीनुसार पथकाने मॉर्निक वॉक करत असतांना संजय तोतला यांना ताब्यात घेतले.

त्यांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येवून त्याच्याही अटकेची नोंद घेण्यात आली. नोंद झाल्यावर त्यांना चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. याठिकाणी तब्बल एक ते दोन तास त्यांची चौकशी करण्यात आली.

आमदारांसह निकटवर्तीयांची पोलीस ठाण्यात धाव

भागवत भंगाळे यांना बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती हवेसारखी शहरात पसरली. भंगाळे यांना ताब्यात घेतल्यावर त्यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे माहिती मिळाल्यावर मॉर्निक करता करताच आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले.

मात्र भंगाळे यांची भेट घेण्यापासून पोलिसांकडून आ. भोळे यांना रोखण्यात आले. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर भास्कर मार्केट येथे आमदार राजू मामा भोळे हे थांबले. आमदार भोळे यांच्याबरोबरच भागवत भंगाळे याचा मुलगा सागर भंगाळे तसेच अनेक निकटवर्तीयांनी माहिती मिळाल्यावर जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले. व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

भागवत भंगाळे यांच्या निवासस्थानी तब्बल 6 तास झाडाझडती

पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात बीएचआर पतसंस्थेत फसवणूक व अपहारप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्हयात जळगाव शहरातील भागवत भंगाळे, संजय तोतला, पाळधी येथील जयश्री मणीयार यांचा तसेच जामनेर येथील जितेंद्र पाटील, राजेश लोढा व छगन झाल्टे यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

त्यानुसार पथकाने अटक वाँरट घेवून आज पहाटेच्या सुमारास संबंधितांना ताब्यात घेण्यात आले. यात भागवत भंगाळे यांची 10 वाजेपर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. निवासस्थानीही सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली.

मिनिट टू मिनिट ठरला कार्यक्रम

पुण्याहून जळगावला रवाना झालेले आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाचे जिल्ह्यात कारवाईपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातून फर्दापूर येथे संचलन झाले. याठिकाणी पथके तयार करण्यात आली तसेच अटक करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.

त्याबाबत अधिकारी, कर्मचार्‍यांची उजळणी करुन घेण्यात आली. याचठिकाणी अटकसत्र कारवाईचा मिनिट टू कार्यक्रम ठरल्यावर स्वतंत्र वाहनाने पथक जळगाव जिल्ह्याकडे रवाना झाली. ठरल्याप्रमाणे सर्व पथके 6 वाजून 10 मिनिटांनी पथके नेमून दिलेल्या संशयिताच्या घरी पोहचलेली होती. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संशयितांना घेवून पथक पुण्याला रवाना

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर संबंधिताची चौकशी केली. ज्या पथकांची चौकशी पूर्ण झाली. ते पुण्याकडे रवाना झाले होते. पहाटे 6 वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल नऊ तास पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या विविध ठिकाणच्या पथकाकडून अटक करण्यात आलेल्या संशयितांसह त्याच्या घराची चौकशी करण्यात आली. विविध ठिकाणी संशयितांना अटक तसेच चौकशी आटोपल्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास पथके संशयितांना सोबत घेत पुण्याकडे रवाना झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com