
नाशिक | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने आगमी निवडणुकीसाठी सरल अॅपचा पर्याय निवडला आहे. सरल अॅपवरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे इच्छुकांना सध्या सरल अॅपचा ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे बावनकुळे यांचा दौरा नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढवून गेला.
खासदार, आमदार, नगरसेवक व्हायचे असेल तर पुढील सलग १३ महिने दररोज तीन तास पक्षासाठी द्यावे, असा सज्जड दमच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आले असतांना त्यांनी इच्छुकांना चांंगलेच कामाला लावले. त्यामुळे सध्या इच्छुक चिंतेत सापडले आहेत. त्या प्रत्येकाने किमान ६०० सरल अॅप डाऊनलोड करावेत, त्यालाच तिकीट मिळणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नगर येथील पत्रकारांविषयीचे वक्तव्य चांगलेच अंगांशी आल्याने नाशिक येथे बंद दाराआड चर्चा कराताना त्यांनी चांंगलीच खबरदारी घेतली होती. माहिती बाहेर जाऊ नये म्हणून बुथ प्रमुखांना भ्रमणध्वनी बंद करायला लावले. सभागृहातून बाहेर आवाज जाणार नाही, बैठकीत कुणी पत्रकार येणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली.
बावनकुळे यांंनी विद्यमान आमदारांनी किती अॅप डाऊनलोड केले, याची पडताळणी केली. ज्येष्ठ बूथ प्रमुखांना काय काम केले, याची विचारणा केली. डिसेंबरला पुन्हा नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे सूचित केले. त्यामुळे बावनकुळे यांचा दौरा नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढवून गेला.
घर चलो अभियान, नागरिकांशी सुसंवाद, कामगार मेळावा असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. शहरातील तिन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. नाशिक पश्चिमचे सीमा हिरे, नाशिक मध्यचे देवयानी फरांदे आणि नाशिक पूर्वचे राहुल ढिकले प्रतिनिधीत्व करतात. संबंधितांनी मतदारसंघनिहाय किती सरल अॅप डाऊनलोड केले, याची आकडेवारी बावनकुळे यांनी घेतली.
स्वत:च्या खांद्यावरील कमळाचे चिन्ह असणारा (शेला) काढून त्यांनी तो नसल्यावर आपण कसे दिसतो आणि तो असल्यावर आपण कसे दिसतो, याची विचारणा करुन पक्षाचे महत्व अधोरेखीत केले. पक्ष आहे म्हणून तुम्ही,आम्ही आहोत. हा गमछा असेपर्यंत किंमत आहे. तो काढला तर शुन्य होते, याची जाणीव करून दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी जिवापाड प्रयत्न करण्याचे आवाहन करतांना जी-२० परिषदेत कोणता करार झाला, या प्रश्नाला एकाही पदाधिकाऱ्याला उत्तर देता आले नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली. अखेर आमदार ढिकले यांनी जैविक कराराची माहीती दिल्याने थोडा दिलासा मिळाला.
आगामी कुठल्याही निवडणुकीत उमेदवारी देताना कोणी, किती सरल अॅप डाऊनलोड केले, हा निकष असणार आहे. एकंदरीत उमेदवारीचे गाजर दाखवत भाजपने बूथ, मतदारसंघात अधिकाधिक अॅप डाऊनलोड करण्याचे नियोजन केले आहे. बैठक आटोपल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. सभागृहातून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांमध्ये काम आम्ही करणार, नंतर सर्व समिकरणे तुम्ही बदलवणार, लोकप्रतिनिधी वेगळे येणार, नंतर ते संपर्काबाहेर राहणार, आज पर्यंतचा अनुभव पाहता पुढील भवितव्यही त्यांंना दिसले.