Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाचा धोका कायम; दिवाळी साजरी करताना काळजी घ्या : पालकमंत्री भुजबळ

करोनाचा धोका कायम; दिवाळी साजरी करताना काळजी घ्या : पालकमंत्री भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलीस यंत्रणा यांनी रात्रंदिवस घेतलेली मेहनत तसेच नागरिकांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यातील करोनाचा वाढता संसर्ग काही प्रमाणात रोखण्यास आपण यशस्वी होत आहोत.

- Advertisement -

परंतु या विषाणूचा धोका अजून पूर्णतः टळलेला नसल्याने या विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करताना देखील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हावासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात काही दिवसांपासून करोना विषाणूचे प्रमाण कमी झाले असले तरी या विषाणूचा प्रादुर्भाव पुर्णतः संपलेला नाही. दिवाळीचा सण साजरा करताना नागरिकांनी या परिस्थितीचे भान ठेवून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी.

करोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन दुकानदारांनी देखील विना मास्क असलेल्या व्यक्तींना वस्तूंची विक्री करून नये, तसेच जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणाना सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. यादृष्टीने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.

जेणेकरून दिवाळी सणांच्या दिवसात मास्कचा वापर करून स्वतःसोबत इतरांच्याही आरोग्याच्या रक्षणाची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी. दिवाळी सणात फटाक्यांच्या वापरामुळे होणार्‍या प्रदूषणाचा विपरीत परिणाम करोना रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कारण कोरोनाचा विषाणू हा फुफ्फुसावर मारा करीत असतो.

त्यामुळे करोनाबाधित आणि कोमॉर्बिड लोकांना या धुराचा त्रास होण्याची शक्यता जास्त असल्याने मोठ्या आवाजाची व प्रदूषण निर्माण करणार्‍या फटाक्यांचा वापर कमीत कमी करावा. तसेच फटाके फोडताना लहान मुलांची काळजी घेण्यात यावी. सॅनिटाईजर हे ज्वलनशिल असल्याने फटाक्यांजवळ सॅनिटाईजरचा वापर करू नये. दिवाळीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी शासनास व प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करण्याचेही आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या