नाशिक । प्रतिनिधी

‘करोना’च्या नव्या विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी आहेत. त्याबाबत प्रशासनाने सतर्क राहून काळजी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आज करोना आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यात महिनाभरापूर्वी 3,423 रुग्णसंख्या होती. आज रुग्णसंख्या 1,701 अर्थात निम्म्यावर आली आहे.

जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा 3 टक्क्यांनी अधिक असून जिल्ह्याचा मृत्यूदरदेखील 1.65 टक्के इतका आहे. नव्याने आलेल्या स्ट्रेनचा विचार करता मुंबई येथे येणार्या परदेशातील प्रवाशांची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री तपासून प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्यांना काही दिवसांसाठी मुंबईतच थांबवणे योग्य होईल. ज्यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

करोनाच्या दुसर्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव हा जलद गतीने होत असल्याने ब्रिटन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात यावे. तसेच परदेशातून मुंबईला येणार्या प्रवाशांपैकी कुणी प्रवासी नाशिकला येत असेल अशा प्रवाशांची माहिती नाशिक प्रशासनाला कळवावी, असे मुंबई प्रशासनास सांगण्यात आले आल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

करोना लसीकरणाबाबत जिल्ह्यात नुकताच घेण्यात आलेला ‘ड्राय रन’ यशस्वीपणे पार पडला आहे. याच अनुषंगाने करोना काळात प्रामुख्याने काम करणारे सर्व संबंधित आरोग्य सेवक यांना प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी प्राधान्य देण्यात यावे. तसेच पोलिस यंत्रणा व इतर संबंधित यंत्रणेची माहिती कोविन अॅपवर भरण्यासाठी जमा करण्याच्या कामाला सुरूवात करावी. त्यामुळे प्रत्यक्ष लसीकरणाची प्रक्रीया सुरू झाल्यावर ती व्यवस्थीतरित्या पार पडण्यास मदत होईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

करोना लसीकरणाबाबत नुकतास जिल्ह्यात ड्राय रन घेण्यात आला.जिल्ह्यात लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज क्षमता आवश्यतेपेक्षा दिडपटीने अधिक आहे. लसीकरणासाठी जिल्हापातळीवर सर्व नियोजन पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.

रुग्णसंख्या घटल्याने दिलासा

येत्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. त्यामुळे फक्त शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर सुरु ठेवण्यात येवून शाळा, महाविद्यालये व खासगी ठिकाणी सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर्स बंद करण्यात यावीत. तेथील मनुष्यबळ व साधन सामुग्रीचा वापर इतर आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी करण्यात यावा.जिल्ह्यात सुरू ठेवण्यात येणार्या कोविड केअर सेंटर्समध्ये संभाव्य परिस्थितीचा विचार करून व पूर्व नियोजनाच्या अनुषंगाने साधारण 4 हजार रुग्णांची सोय होईल, अशा पद्धतीने व्यवस्था कायम ठेवण्यात यावी. या अनुषंगाने केलेल्या व्यवस्थेचा अहवाल संबंधित विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.

‘भंडारा’ची पुनरावृत्ती टाळा

भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांच्या विद्युत व्यवस्थेची सार्वजनिक बांधकाम व अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात यावी. त्याबाबत नियमितपणे देखभाल दुरूस्ती करण्यात यावी. तसेच फायर एक्स्टिंग्विशर हाताळणीसंदर्भात सेवकांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या.