
नागपूर | Nagpur
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नागपूरमध्ये (Nagpur) 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार' अशा आशयाचे बॅनर झळकले होते. त्यानंतर आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे 'वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का' असा मजकूर असलेले बॅनर नागपूरात झळकले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे...
नागपूरातील लक्ष्मीभवन चौक आणि इतर परिसरात हे बॅनर लावण्यात आले असून राष्ट्रवादीचे (NCP) नेते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या बॅनरवर शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रफुल्ल पटेल यांचे देखील फोटो आहेत.
तसेच काल अजित पवार (Ajit Pawar) यांची सासूरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तेर आणि मुंबईत (Mumbai) देखील अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे लिहिलेले बॅनर झळकले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर पुण्यातील कोथरुडमध्ये 'जनतेच्या मनातला मुख्यमंत्री' असा उल्लेख असणारे बॅनर झळकले होते. यानंतर राज्यातील विविध ठिकाणी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. त्यात आज नागपुरात लागलेल्या बॅनरवरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.