जिल्ह्यात केळीचा खप वाढला; विक्रेत्यांना सुगीचे दिवस

जिल्ह्यात केळीचा खप वाढला; विक्रेत्यांना सुगीचे दिवस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्रावणातील उपवास, त्यानंतर रमजान ईदच्या महिन्यात रोजाच्या दिवशी केळीचे भाव वाढतात. इतर वेळी केळीला फारसा भाव नसतो. साधारण पावसाळ्यापासून हिवाळा जाईपर्यंत खपाअभावी केळी विक्रेत्यांना मिळेल त्या भावावर समाधान मानावे लागते. मात्र यंदा केळी उत्पादकांंना चांगले दिवस आले असून दर बुधवारी साडेसहा लाख केळी हमखास नाशिक जिल्ह्यात खपली जाऊ लागली आहेत. आता हिवाळ्यातही 40 ते 50 रुपये डझनने केळी मिळत आहेत.

शालेय पोषण आहाराव्यतिरिक्त पूरक आहार आठवड्याला एकदा जिल्ह्यात दिला जात असून नूतन माध्यमिक शिक्षण अधिकारी भगवान फुलारी यांनी यावर्षी शालेय पोषण पूरक आहारात केळीचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात 4431 शाळा आहेत. त्यात सहा लाख 61 हजार 695 विद्यार्थी शिकत आहेत. त्या सर्वार्ंना दर बुधवारी एक केळ देण्याचे आदेश देण्यात आले आहे. एकही विद्यार्थी केळीपासून वंचित राहिल्यास शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांंना जबाबदार धरत असल्याने दर बुधवारी न चुकता केळी वाटपाचा कार्यक्रम गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु झाला आहे. केळी वाचून कोणीही राहू नये म्हणून शिक्षक दोन दिवस अगोदरच बाजारातून केळी आणून ठेवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अचानक केळीचा खप वाढला असून आता 40 रुपये डझनच्यावरच केळी मिळत आहेत.

बुधवारी तर बाजारात इतरांना केळी लवकर दिसतच नाही, अशी स्थिती आहे. म्हणूनच केळी विक्रेत्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. हा खर्च शालेय पोषण आहारासाठी मिळणार्‍या निधीतून उरणार्‍या रकमेेतून केला जात आहे. पुरक आहारात केळाचा समावेश असल्याने त्याला विरोध नाही. मात्र या पुरक आहारात चिक्की, लाह्या, राजगीरा लाडू, दूध, अंडी यांंचाही समावेश आहे. स्थानिक बाजारातील वरीलपैकी इतरही काही पदार्थ वाटण्याची मुभा दिली तर कदाचित त्यांंनाही रोजगार मिळेल, मात्र आता केळावर फुलारी फिदा असल्याने केळी उत्पादकांची चांदी होत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी 70 कोटी रुपये खर्च

या शालेय पोषण आहार योजनेसाठी राज्यात 1682 कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी या योजनेवर आतापर्यंत 992 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात दरवर्षी 70 कोटी रुपये त्यावर खर्च होतो. अन्न महामंडळाकडून तांदूळ पुरवठा करण्यात येतो. कडधान्ये खरेदी राज्य शासन करते. शालेय पातळीवर स्थानिक समितीमार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. विद्यार्थांना चांगला आहार देण्याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जाते. इंधन व तेल, मीठ, मिरची, मसाल्याचा खर्चासाठी पहिली ते पाचवीसाठी दरडोई 5.45 रुपये, तर सहावी ते आठवीसाठी 8.17 रुपये दिले जातात. त्यातून वाचणार्‍या खर्चातून हा पूरक आहार दिला जातो. एक केेळ साधारण चार रुपयांना म्हटले तरी 25 लाख रुपयांची उलाढाल यामुळे दर आठवड्यात केळात होऊ लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com