
नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad
सिन्नर फाटा येथे किरकोळ कारणाच्या वादातून रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या बाहेर एका 21 वर्षे वयाच्या युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज सायंकाळच्या दरम्यान घडली.
दरम्यान या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून खून केल्यानंतर संशयित हा फरार झाला आहे. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या बाहेर फुगे विक्रेत्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
त्यानंतर संबंधित संशयिताने अजय काळे (21) या युवकावर चाकूने वार केला. या घटनेनंतर संशयिताने आणखी एकावर हल्ला केला. त्यात संबंधित युवक जखमी असल्याचे समजते.
ही घटना समजताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व घटनेची माहिती घेतली. मयत युवकाच्या नातेवाईकांचे जाब जबाब घेण्याचे काम सुरू आहे. मयत अजय काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. काळे हा औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात राहणारा आहे.