बाळासाहेबांचे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल – उद्धव ठाकरे

बाळासाहेबांचे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल – उद्धव ठाकरे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena party chief Late.Balasaheb Thackeray )यांच्या स्मारकात शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो असतील. मात्र, शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी करुन मुख्यमंत्री झालेल्यांचे फोटो नसतील, असा सणसणीत टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party chief Uddhav Thackeray)यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

मुंबईत महापौर निवासस्थानी होऊ घातलेले बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक कसे असेल याचे आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझी ऊर्जा कधी कमी होत नाही, माझ्यात बाळासाहेब आहेत. त्यामुळे माझ्यातीली ऊर्जा कधी कमी होतच नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारकडून मदत होत आहे. मात्र त्यासंदर्भात सुभाष देसाई उत्तर देतील. आधी मी बोलतो नंतर देसाईंना माईक देतो, नंतर त्यांच्या हातून माइक परत घेणे बरोबर नाही, असे म्हणत ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही चिमटा काढला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन येत्या १७ नोव्हेंबरला असून त्यांच्या स्मारकाचा विषय चर्चेत असतो. त्यामुळे स्मारक नेमके कधी आणि कसे होणार याबद्दल कुतूहल आहे. हे पहिल्या टप्प्यातील सादरीकरण असून बाकी अनेक गोष्टी आपण तिथे करणार आहोत. संग्रहालयाबाबतही आपण काम करत आहोत. त्यांच्याबद्दल देखील चर्चा झाली. अनेकांनी पुतळा कुठे असेल असे विचारले, मात्र इथे पुतळा नाही, तर हे स्मारक प्रेरणा स्थान असणार आहे. स्मारकासाठी वेळ लागत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. मात्र ही हेरिटेज वास्तू आहे. त्यामुळे वास्तूला धक्का न पोहोचवता काम करतो आहोत. संग्रहालयाला धोका पोहोचणार नाही असे बांधकाम करावे लागत आहे. बाजूला समुद्र देखील आहे, जमिनीखाली देखील बांधकाम करावे लागत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

बाळासाहेबांची सर्व जुनी भाषणे आम्ही मिळवत आहोत. भाषणे, मोर्चे असे सर्व येथे असणार आहे. मार्मिकचे सर्व अंक गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यासर्व गोष्टी देखील आपण दाखवणार आहोत. लोकांना जिवंत अनुभव द्यायचा आहे. जो कोणी खचला असेल, त्याला संग्रहालय बघितल्यावर प्रेरणा मिळेल, एवढ्या ताकदीचे हे प्रेरणास्थान करायचे आहे. शिवसेनाप्रमुखांविषयी सांगण्यासारखे जे काही कोणाकडे असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

पहिला टप्पा मे २०२३ पर्यंत पूर्ण होणार

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा हा मे २०२३ पर्यंत पूर्ण केला जाईल. तसेच संपूर्ण स्मारकाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती स्मारक न्यासाचे सदस्य सचिव सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com