कोरोना रुग्णावर आयुर्वेद, होमिओपॅथी उपचारासाठी चाचपाणी

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश : दिल्ली आणि जयपूरमध्ये आयुर्वेदला मान्यता
कोरोना रुग्णावर आयुर्वेद, होमिओपॅथी उपचारासाठी चाचपाणी

मुंबई

दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुषच्या पर्यायी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले.

आयुष टास्कफोर्सच्या सदस्यांची ऑनलाइन बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, कोविड रुग्णांची संख्या तातडीने कमी करणे आवश्यक आहे. कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा पर्यायी उपचार पद्धती देता येऊ शकतात. त्यासाठी आदर्श नियमावली (एस.ओ.पी)तयार करण्याचे काम आयुष संचालनायामार्फत तातडीने करण्यात येणार आहे.

.

गेल्या जवळपास वर्षभरापासून अधिक काळ कोविड संकटाशी आपण सामना करत असून अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. वाढत्या कोविड रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्स कमी पडत आहेत हे लक्षात घेऊन या कामी राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या अडीच लाख आयुष डॉक्टरांचा उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करून घेता येईल याबाबत विचार करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली.

कोविडची लागण होऊ नये यासाठी त्याचप्रमाणे कोविड बाधित रुग्णांसाठीही प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या अनेक औषधांना केंद्रीय आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे तसेच अशा प्रकारची अनेक चांगली औषधे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत ही औषधे लवकरात लवकर कशी उपलब्ध करून देता येतील याबाबतही प्रयत्न करण्याचे यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

दिल्ली आणि जयपूरमध्ये आयुर्वेदला मान्यता

सध्या दिल्ली आणि जयपूरमध्ये कोविडसाठी आयुर्वेद उपचाराला मान्यता देण्यात आली असल्याने हाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येईल. यामुळे आयुष डॉक्टरांचे मोठे संख्याबळ उपलब्ध होणार आहे. आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीना उपचारांसाठी परवानगी द्यावी असे केंद्र शासनाकडे आयुष संचालनायामार्फत पत्र देण्यात येईल. कोविडसाठी उपचार पद्धती निरनिराळ्या असून ऍलोपॅथी यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असली तरी अल्टरनेटीव्ह थेरपी निरनिराळ्याअसू शकतात. आयुष संचालनायांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी या क्षेत्रात चांगले काम आणि संशोधन केलेले आहे. त्यामुळे आपल्या संशोधनाच्या कामाचा, ज्ञानाचा उपयोग या काळात करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात होमिओपॅथिक आयुर्वेदिक, औषधे यांना मान्यता देताना त्यांनी मानके परिपूर्ण केली आहेत का हे तपासून घेणे आवश्यक आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com