Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींंना पुरस्कार

जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींंना पुरस्कार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

 आज राष्ट्रीय पंचायती राज दिनी (दि.२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडुन इगतपुरी तालुक्यातील मोडाळे व नाशिक तालुक्यातील दरी या ग्रामपंचायतींना ‘पंडित दिन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण” पुरस्काराने (Pandit Din Dayal Upadhyay Panchayat Empowerment Puraskar )ऑनलाईन पद्धतीने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान यांच्या हस्ते पुरस्काराची रक्कम प्रत्येकी 10 लाख पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आली.हा कार्यक्रम जम्मु काश्मिरमधील पल्ली या ग्रामपंचायतीमधुन करण्यात आला.

- Advertisement -

केंद्र शासनाकडून प्राप्त सन्मानचिन्ह मोडाळे ग्रामपंचायतीस ( Modale Grampanchayat )इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर ( MLA Hiraman Khoskar ) व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते मोडाळे येथे व दरी ग्रामपंचायतीचा ( Dari Grampanchayat )पुरस्कार गट विकास अधिकारी सारिका बारी यांच्या हस्ते दरी येथे प्रदान करण्यात आला.

मोडाळे या ग्रामपंचायतीस पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हा मोडाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार इगतपुरी- त्रंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते मोडाळे ग्रामपंचायत सरपंच मंगला बोंबले, उपसरपंच सिताबाई शेंडगे, सदस्य अंजना बोडके, संतोष बोडके, विठ्ठल जगताप, लिलाबाई गोऱ्हे, आशा धात्रक, विमल शिंदे, ज्ञानेश्वर इंगोले, लंकाबाई ढोन्नर व ग्रामसेवक नानासाहेब खांडेकर यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, इगतपुरीच्या गट विकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे सहायक गट विकास अधिकारी भरत वंदे, पंचायत समिती इगतपुरीचे सहायक गट विकास अधिकारी अमित भुसावरे, विस्तार अधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कन्हाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, उपअभियंता संजय पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडीत वाकडे, पशुधन विकास अधिकारी प्रदीप कांगणे, गट शिक्षणाधिकारी राजेश तायडे उपस्थित होते.

ग्रामपंचायतीस पुरस्कार मिळाला असला तरी यापुढे गावांच्या सर्वांगीण विकासासाठी व 17 शाश्वत विकासाची ध्येये व गरिबीमुक्त आणि उपजिविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, पायाभुतसुविधा युक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव आणि लिंग समभाव पोषक गाव या 9 विषयांवर काम करावे, असे सांगत ग्रामसभेस उपस्थित ग्रामस्थांना किसान क्रेडिट कार्ड, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आमदार हिरामण खोसकर यांनी अति दुर्गम भागातील मोडाळे गावाने विकासाची साधलेली किमया वाखानण्याजोगी असून ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेली उच्चत्तम कामगिरी पुरस्कारास पात्रता ठरली म्हणून अभिनंदन केले.

दरी येथील पुरस्कार नाशिक पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी यांच्या हस्ते ग्रामपंचातीचे सरपंच अलका गांगोडे, उपसंरपंच अर्जुन भोई, ग्रामपंचायत सदस्य अॅडव्होकेट अरुण दोंदे, शितल पिंगळे, संजना ढेरिंगे, भारत पिंगळे, सुनिता बेंडकोळी, मिना आचारी, सारिका भोई, भाउराव आचारी व ग्रामसेवक सचिन पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळेस नाशिक पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी विनोद मेढे, विस्तार अधिकारी जगन्नाथ सोनवणे, श्रीधर सानप, बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती देशमुख तसेच राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाचे लेखापाल विश्वास लव्हारे उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पोस्टर्स स्पर्धा व विद्यार्थ्याना बक्षिस वितरण, बालसभा व विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते व या विशेष ग्रामसभेत किसान क्रेडिट • कार्ड, जल जिवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना याबाबतचे विषय प्राधान्याने ग्रामसभेत मांडण्यात आले व त्यानुसार सर्व पात्र प्रस्ताव तात्काळ सादर करण्याबाबत सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले. तसेच सर्व ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या बालसभेत बालकांनी मांडलेले विचार त्यांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या याबाबत ग्रामपंचायतीने त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत व त्यांनी सूचविलेली कामे यांचा समावेश ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यात करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिलेत.

पंतप्रधान यांच्या कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील सदस्य व ग्रामस्थ हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. सन 2020-21 या वर्षात नाशिक तालुक्यातील जाखोरी व इगतपुरी तालुक्यातील नागोसली, तर 2019-20 या वर्षात नाशिक तालुक्यातीलच कोटमगांव व ओढा या ग्रामपंचायतीस हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे व मागील 3 वर्षात 6 राष्ट्रीय पुरस्कार नाशिक जिल्ह्याला मिळाले आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या