Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानिर्भया निधीचे लेखापरीक्षण करा

निर्भया निधीचे लेखापरीक्षण करा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या निर्भया (Nirbhaya )पथकातील वाहने फुटीर आमदारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जात आहेत. या पथकासाठी केंद्र सरकारनेही निधी दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या निधीचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने आज केली. फुटीर आमदारांच्या सुरक्षेवर तैनात केलेली ही वाहने सात दिवसांत पुन्हा निर्भया पथकात सामील न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी ( Shiv Sena MP and spokesperson Priyanka Chaturvedi)यांनी दिला.

- Advertisement -

राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने शिवसेना भवनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी आमदार मनीषा कायंदे, माजी महापौर श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.

राज्यात गेल्या पाच महिन्यात महिलांमध्ये असुरक्षितता वाढत आहे. बालिकांवर, लहान मुलींवर बलात्कार, सामूहिक बलात्कार, परदेशी महिलांच्या विनयभंगाच्या घटना वाढत आहेत .पण शिंदे-फडणवीस सरकारचे महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य नाही. त्यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही. यावरून या सरकारचा महिलांविषयीचा दृष्टीकोन दिसून येतो, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. निर्भया पथकातील वाहनांचा वापर फुटीर आमदारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी केला जात असल्याबद्दल चतुर्वेदी जोरदार टीका केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाला 30 कोटी रुपयांचा निधी दिला. केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया फंड स्थापन केला. राज्यातील निर्भया पथकासाठी केंद्राचाही निधी आहे. हा प्रामाणिक करदात्यांचा पैसा आहे. निर्भया पथकातील वाहने फुटीर आमदारांच्या सुरक्षेवर वापरून राज्य सरकारने करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग केला आहे. केंद्र सरकारने याची गंभीर दखल घ्यावी. केंद्राने दिलेला निर्भया निधीचा किती आणि कसा वापरला याचे लेखापरीक्षण करावे अशी मागणी आम्ही केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे करणार आहोत, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.

निर्भया निधीतील वाहने आमदारांच्या संरक्षणासाठी : पाटील

महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने निर्भया निधी तयार केले. मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. ही वाहने तत्काळ पोलीस ठाण्यात जमा करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

एकीकडे मुख्यमंत्री जनता आपल्यासोबत असल्याचा दावा करतात तर दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार आणि खासदाराला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात. जनता त्यांच्यासोबत असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते? असा सवालही पाटील यांनी केला.

दरम्यान, निर्भया निधीतून घेतलेली आणि फुटीर आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणारी वाहने त्वरित पोलिसांना द्यावीत, अशी मागणी करून आमदारांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्यातील जनता आणि महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्वाची वाटते, असे पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या