Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याPankaja Munde : पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार? समर्थकांसह राज्याचे लक्ष

Pankaja Munde : पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार? समर्थकांसह राज्याचे लक्ष

नाशिक | मोहन कानकाटे | Nashik 

भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर आणि सध्या भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादीतून आमदार असलेल्या एकनाथ खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रात (Maharashtra) भाजप (BJP) तळागळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. मात्र, याच पक्षाच्या नेत्यांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा सध्याच्या देशासह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना विसर पडल्याचे दिसत आहे. या सर्व नेत्यांमधील एकेकाळी देशासह राज्यातील मातब्बर नेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना सातत्याने पक्षातून डावलंल जात असल्याने त्यांचे भाजपमध्ये महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बीड (Beed) येथील भगवान गडावर होणाऱ्या यंदाच्या दसरा मेळाव्याच्या (Dussehra Gathering) दिवशी पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे त्यांच्या समर्थकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे…

- Advertisement -

पंकजा मुंडेंकडे सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदाची आणि मध्यप्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या मुंडे पेलतांना दिसत आहेत. मात्र,मागील काही वर्षांपासून त्यांचे राज्याच्या राजकारणात भाजपमधील एका बड्या नेत्यांकडून खच्चीकरण करण्यात येत असल्याचे बघायला मिळत आहे. मुंडे यांचे वारंवार होणारे खच्चीकरण आणि सातत्याने डावलले जाणे, यामुळे मुंडे समर्थकांकडून (Supporters) पक्षामधील काही नेत्यांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेकदा खुद्द पंकजा मुंडेंनीही आपल्या मनातील खदखद बोलून दाखवलेली आहे. परंतु, त्या कुठलाही निर्णय घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे पंकजाताईंनी आता पक्ष सोडावा, आणखी अपमान सहन करू नये, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.   

Supriya Sule : “…तर करारा जवाब दिला असता”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर सुप्रिया सुळेंचे भुजबळांना प्रत्युत्तर

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी  पंकजा यांच्यासह पक्षालाही त्याचा फायदा झाला होता. असे असताना त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना हे खुपले नाही. त्यातच वडील दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा समृद्ध वारसा त्यांच्या मागे आहे. वडिलांची पुण्याई किती दिवस चालणार, असाही संदेश पक्षांतर्गत विरोधकांकडून पद्धतशीरपणे खालपर्यंत देण्यात आला. दुसऱ्या बाजूला याच नेत्यांनी अन्य पक्षांतील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मंत्रिपदे दिली. मात्र, पंकजा यांना विविध निकष लावण्यात आले होते.

त्यानंतर २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यानंतर भाजपकडून पंकजा मुंडे या मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. पण, त्या विचार करून बोलत नाहीत, अशी भावना राज्यातील पक्षश्रेष्ठींच्या मनात रुजली आणि तेव्हापासून त्यांना बाजूला केले गेले. त्यातच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजांचा त्यांचे चुलत बंधू आणि सध्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पराभव केला. परंतु, पंकजा मुंडेंच्या या पराभवाला पक्षातील काही लोकांनीच रसद पुरवली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तर दुसरीकडे पक्षाला सबळ कारणच मिळाले होते. बाहेरच्या पक्षांमधून आलेल्या लोकांचे भाजपने पुनर्वसन केले, मंत्रिपदे दिली. काहींच्या मागे लागलेला चौकशांचा ससेमिरा थांबवला. पण स्वपक्षातील मास लीडर असलेल्या मुंडे यांच्याकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष केले. तेव्हापासून राज्याच्या राजकारणातून पंकजा बाजूला पडलेल्या दिसत आहेत.  

MLA Bharat Gogawale : “सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेऊ नये हे आमचं आणि भाजपच्या आमदारांचं…”; भरत गोगावले स्पष्टच बोलले

त्यातच पंकजा मुंडे यांनी नुकतीच महिनाभरापूर्वी राज्यातील विविध भागांत ५ हजार किलोमीटरची शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. या यात्रेला त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. मात्र, ही यात्रा पक्षांतर्गत विरोधकांच्या पचनी पडलेली दिसत नाही. कारण काही दिवसांपूर्वी १९ कोटी रुपयांचा कर थकवला म्हणून मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली. त्यानंतर पंकजांच्या कार्यकर्त्यांमधून ही कारवाई पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी केली गेली असा सुर उमटू लागला. यानंतर  १९ कोटी रुपयांची रक्कम कार्यकर्त्यांनी लोक सहभाग आणि लोक चळवळीतून देणार असल्याचा निर्धार व्यक्त करत दसरा मेळाव्याच्या दिवशी ही जमा केलेली रक्कम मुंडे यांना सुपूर्द करणार असे म्हटले होते. त्यानंतर मुंडे समर्थकांनी विविध चेकच्या माध्यमातून जवळपास ११ कोटींहून अधिक रक्कम जमा केली होती. परंतु, यानंतर मुंडेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत ‘मला आर्थिक मदत करू नका, तुमचं प्रेम राहू द्या, असे म्हणत कार्यकर्त्यांना रक्कम जमा न करण्याचे आवाहन केले होते. 

दरम्यान, पंकजा मुंडे या वंजारी समाजाच्या असल्याने व त्यांचा वारसा संघर्षाचा असल्यामुळे त्यांच्या मागे ओबीसी समाजाची (OBC Community) मोठी ताकद आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांनी पंकजा मुंडेंची मोठी कोंडी केली असून पंकजा या नमते घ्यायला किंवा शरण यायला तयार नाहीत, असे त्यांना कळून चूकले आहे. त्यातच राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून पंकजा यांचा पराभव करणारे त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे देखील अजितदादांसोबत सत्तेत सहभागी झाले असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत स्टँडिंग आमदार म्हणून परळीची जागा धनंजय यांना सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून आगामी काळात पंकजा यांनी स्वत:साठी व समर्थकांसाठी योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Israel Palestine War : इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात परतली

- Advertisment -

ताज्या बातम्या