Sunday, April 28, 2024
HomeनाशिकVideo : परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष - चैतन्यमहाराज

Video : परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष – चैतन्यमहाराज

नाशिक । विशेष प्रतिनिधी Nashik

धर्म हवा तो भगवत स्वरूपाला प्राप्त व्हावे यासाठी! मोक्ष म्हणजे आत्यंतिक सुख. दु:खाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष! त्या मोक्षाकरता धर्म आहे. चालत आलेल्या धर्माचे पालन करणे एक मर्यादेत आहे. एकदा त्याचे काम झाले की, तो धर्म बाजूला पडेल. राहील तो मोक्ष! धर्म, अर्थ, कामाच्या समन्वयातून जो मोक्ष मिळतो त्या मोक्षाचाही निषेध होतो. मोक्ष कोणाला? जो बंधात आहे त्याला. बंधच नसेल तर मोक्ष कशाला? दु:ख निवृत्तीपूर्वी नित्यानंदाची प्राप्ती होते. त्या मोक्षाकरता धर्म आहे. मोक्ष मिळवणे हे परमप्रयोजन नाही. मिळालेला मोक्ष जगाला देणे हे परमप्रयोजन आहे, असे विचार संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर(Chaitanyamahraj Deglurkar ) यांनी मांडले.

- Advertisement -

परमपूज्य वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या 60 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त( Late. Bastiramji Sarada 60th Death Anniversary) येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचे तिसरे आणि अंतिम पुष्प चैतन्यमहाराजांनी आज गुंफले. प्रारंभी बस्तीरामजी सारडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.

आजच्या व्याख्यानात चैतन्यमहाराजांनी विविध दृष्टांत सांगून विषयाची उकल केली. धर्म, अर्थ आणि कामाच्या समन्वयातून जो मोक्ष मिळतो त्या मोक्षाचाही निषेध होतो. मोक्ष कोणाला, जो बंधनात आहे त्याला. बंधनच नाही तर मोक्ष कशाला? मोक्षाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. दु:ख निवृत्तीपूर्वी नित्यानंदाची प्राप्ती होते. धर्म, अर्थ, काम, मोक्षप्राप्ती कशासाठी आहे? मोक्ष मिळवणे हे परमप्रयोजन नाही. तर मिळालेला मोक्ष जगाला देक्षे हा परमार्थ आहे. मोक्ष मिळाल्याशिवाय त्याचा निषेध होत नाही, असे महाराज म्हणाले.

धर्म, अर्थ, काम, प्रपंच या संकल्पना चैतन्यमहाराजांनी सोप्या भाषेत सोदाहरण समजावून सांगितल्या. धर्माची मर्यादा पाळून अर्थ आणि कामाचे सेवन करणे हा प्रपंच! हा महाभारताचा विचार आहे. धर्माचे नियम पाळून अर्थप्राप्ती केली पाहिजे. सगळे जग अर्थाचा दास आहे, पण अर्थ कोणाचा दास नाही. जसे अर्थाच्या संबंधाने तसेच कामाच्या संबंधाने आहे. विषयाचे सेवन म्हणजे काम एवढाच त्याचा अर्थ नाही. काम म्हणजे इच्छा! जन्माला आल्यापासून पहिली वृत्ती निर्माण होते ती इच्छा! काम, विषयाच्या प्राप्तीची इच्छा या अर्थाने आहे.

कर्माने प्राप्त झालेल्या गोष्टी समाधानाचा आभास निर्माण करतात. आभासालाच वेदांत प्रपंच म्हणतो. प्रपंच म्हणजे आभास निवृत्त झाला की, त्यालाच वेदांत परमार्थ म्हणतो. कुठेतरी अंत:करणात आकांक्षा आहे. धर्म, अर्थ, काम या गोष्टीत कल्याण वाटते. म्हणून इप्सिताच्या सिद्धीकरता अनेक पर्याय उपलब्ध असतात. मोक्ष प्राप्तीकरता धर्म, अर्थ आणि कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. पायर्‍या हे समन्वयाचे उदाहरण! रेल्वे ज्या रुळावर धावते ते रूळ समुच्चयाचे उत्तम उदाहरण आहेत. माणूस एकेक पायरी चढून पुढे जातो. मागची पायरी ही पुढच्या पायरीचे साधन आहे. ती पायरी साधन झाल्याने पुढची पायरी मागच्या पायरीचे साध्य आहे. जे साध्य वाटते ते साधन होते. त्याला समुच्चय म्हणतात.

रेल्वेला रूळांची आवश्यकता आहे, पण ते एकत्र येत नाहीत. तेव्हा तो समुच्चयवाद ठरतो. कर्म केल्याबरोबर भगवतप्राप्ती होत नाही. मोक्षप्राप्तीकरता आमचा अधिकार सिद्ध केला पाहिजे. म्हणून धर्म, अर्थ आणि कामाचा विचार करण्याची आवश्यकता आहे. या तिन्हीची आवश्यकता समन्वयाने स्वीकारली गेली आहे, असे महाराजांनी सांगितले.

एखाद्या विकाराला जिंकणे आणि एखादा विकार मागे पडणे यात अंतर आहे. आम्हाला विकार जिंकता आला पाहिजे. विकारांबरोबर विचारही जिंकता आला पाहिजे. तर तो परमार्थ होतो. विचारांची गरज संपली पाहिजे. विचाराचा एक तरंग शांत व्हावा व दुसरा तरंग निर्माणच होऊ नये, पण असे होत नाही. एक विचार संपण्याच्या आत दुसरा विचार सुरू होतो. विचारांचे तरंग निर्माण होतात, असे ते म्हणाले.

आई, मुलगा आणि निषेध

धर्म, अर्थ, काम यांचा विचार मोक्ष मिळावा, मानवी जीवन समृद्ध, परिपूर्ण व्हावे, व्यापक व्हावे याकरता आहे. निषेध तेव्हाच संभवतो जेव्हा त्याची प्राप्ती होते. निषेध अप्राप्तीत नसतो. तो प्राप्तीत असतो. वेदांतात एक सुंदर दृष्टांत आहे. एका गावाच्या जत्रेत एक स्त्री आपल्या मुलाला शाळेतून घेऊन गेली. जत्रेत खूप गर्दी होती. जाताना तिला साडीचे दुकान दिसले. खेड्यातील ती स्त्री. साड्या पाहू लागली. मुलाचा हात धरलेला असताना गर्दीच्या लोंढ्यात मुलगा पुढे निघून गेला. साडीचे प्रकरण जमले नाही. नंतर ती मुलाला शोधू लागली. शेवटी ती थकली. रडू लागली.

एका सद्गृहस्थाने तिला रडण्याचे कारण विचारले. मुलगा हरवल्याचे तिने सांगितले. त्याने जत्रेतील पोलीस ठाण्यात तक्रार करायला सांगितले. ती पोलिसांकडे गेली. तक्रार दिली. पोलिसांनी मुलाचे वर्णन विचारले. तिने पांढरा शर्ट, निळी चड्डी, सावळा रंग असे वर्णन सांगितले. पोलिसांनी जत्रेतून तिने सांगितलेल्या वर्णनाची आठ मुले आणून उभी केली. एकेक मुलगा तिला दाखवला, पण हा आपला मुलगा नसल्याचे सांगून तिने प्रत्येक मुलाचा निषेध केला. थोडक्यात, ज्याचा निषेध करायचा त्याचे ज्ञान असावे लागते.

मर्यादा पाळाव्याच लागतील

आपल्या संविधानाने माणूस म्हणून स्वातंत्र्य दिले आहे, पण स्वातंत्र्य म्हणजे कोणालाही न जुमानता कसेही वागायचे, याला स्वातंत्र्य म्हणायचे का? आम्ही मोठे झालो, आता आई-वडिलांनी आम्हाला काही सांगू-शिकवू नये, असे तरुणांना वाटते. स्वातंत्र्य हवे, असे त्यांनीच म्हणावे ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थ ठाऊक आहे. जीवन धन्य करायचे असेल तर मर्यादा पाळाव्याच लागतील. धर्माची मर्यादा याचाच अर्थ नियमांची मर्यादा! अर्थ आणि कामाचा निषेध धर्माच्या नियमातच झाला पाहिजे. अर्थ मिळवला पाहिजे. कामाचा स्वीकार हा धर्मच, त्याग हासुद्धा धर्मच! जसजशी विचारांची प्रगल्भता वाढत जाते, तसतशा धर्माच्या मर्यादा कमी होतात. त्यांना धर्म पाळण्याची आवश्यकता नसते.

व्याख्यानमालेच्या समारोपावेळी चैतन्यमहाराजांनी सारडा परिवार आणि उपस्थित श्रोत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दै.’देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी पुढचा वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा पुण्यतिथी सोहळा 2024 मध्ये 12, 13 आणि 14 जानेवारीला होईल, असे जाहीर केले. शेवटी त्यांनी चैतन्यमहाराजांना पुष्पगुच्छ देऊन ऋण व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या