Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील उद्योग विश्व सरकार सोबत

करोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील उद्योग विश्व सरकार सोबत

मुंबई । प्रतिनिधी

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे. याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी उद्योगांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे, असा विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला.

- Advertisement -

कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात आणि कार्यप्रणाली अवलंबवावी अशी सूचनाही ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी आज दुरदृश्य प्रणालीद्वारे फिकी, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधून राज्याला या काळात ज्या गोष्टींची गरज आहे त्यात पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.

उद्योगांचा टास्क फोर्स तातडीने स्थापणार

राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा, असे निर्देश ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले.

राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढविणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरु करतील, असेही सांगण्यात आले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही बैठकीत आपल्या सूचना मांडल्या. या बैठकीत उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी.त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एन सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशीष अग्रवाल आदि उद्योगपती सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या