वादळग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत

वादळग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत

मुख्यमंत्री ठाकरे उद्या कोकण दौऱ्यावर; मदतीबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

मुंबई |प्रतिनिधी


तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील शेतकरी, नागरिकांना तूर्तास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनच्या (एनडीआरएफ) निकषानुसार मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवार आणि शनिवार कोकणचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यानंतर वादळग्रस्तांच्या मदतीची घोषणा होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा मंत्र्यांकडून उपस्थित करण्यात आला. चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघरला बसला आहे. कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी, मच्छीमार यांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांचीही मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे यावेळी निकष बाजूला सारून मदत करण्याची मागणी मंत्र्यांनी बैठकीत केली.

वादळात किती नुकसान झाले याचा अजून अंदाज नाही. नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. सरकार सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे तूर्तास एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तातडीने मदत दिली जाईल. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदत वाढवून दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी कोरोना संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी लागणाऱ्या औषधांचा मुद्दा मांडणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा
दरम्यान उद्धव ठाकरे हे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस कोकणचा दौरा करणार आहेत. शुक्रवारी ठाकरे हे रत्नागिरी जिल्ह्यात जातील. तर शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले तालुक्याला भेट देतील. या दौऱ्यात ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com